Dainik Maval News : रिंग रोड केल्याशिवाय पुणे, पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडी सुटू शकत नाही. रिंग रोडची निविदा काढली आहे. रिंग रोडला समांतर लोहमार्ग करावा लागणार आहे. तळेगाव दाभाडे ते चाकण रांजणगावमार्गे उरुळीकांचन असा लोहमार्ग केला जाणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या तसे विचाराधीन असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
मंगळवारी (दि. 17 जून) रोजी पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. हा मार्ग झाल्यास झाल्यास पुणे स्थानकावरील ताण काम होईल, असेही ते म्हणाले.
याप्रसंगी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष योगेश बहल, माजी आमदार विलास लांडे, माजी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नाना काटे, शाम लांडे उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, पुढील ५० वर्षांचे नियोजन करून शहराचा विकास केला. पवना बंदिस्त जलवाहिनीच्या कामात काहींनी स्वत:ची पोळी भाजून घेतली. शहरातील वाढत्या लोकसंख्येला वाढीव पाण्याची आवश्यकता आहे. गगनचुंबी इमारती उभारल्या जात आहेत. झोपड्या नसताना झोपड्या दाखवून ‘टीडीआर’ काढला जातो. अशा तक्रारी आल्या आहेत. त्यात तथ्य किती हे शोधले पाहिजे. दूषित पाणीपुरवठा, अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी, रस्त्याची दुरवस्था यावर काम केले जाईल. शहराचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास केला जाईल. भोसरी विधानसभा मतदारसंघातील एमआयडीसी भागाला अतिक्रमणाचा विळखा असल्याच्या तक्रारी येत आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन ते अतिक्रमण काढले जाईल.’
‘रेड झोनच्या मोजणीचा नकाशा प्रसिद्ध करण्यासह शहरातील विविध प्रश्न सोडविले जातील. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे त्यांची बदली होऊन नवीन आयुक्त येण्याची दाट शक्यता आहे. नवीन आयुक्तांसोबत चर्चा करून शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात येतील,’ असेही पवार म्हणाले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कुंडमळा ठिकाणी दर्शक गॅलरी असणारा पूल उभारणार, अतिरिक्त निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन
– जिल्ह्यातील सर्व पुल, साकव, रस्ते, इमारती, वाडे, जाहिरात फलकांची ७ दिवसात बांधकाम तपासणी करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
– वडगाव नगरपंचायतीकडून शहराचा प्रारूप विकास आराखडा (डीपी) प्रसिद्ध । Vadgaon Maval Nagar Panchayat