तळेगाव दाभाडे, 26 जुलै – आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकाराने तळेगाव दाभाडे येथे 31 जुलैपर्यंत नवीन मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे.या अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सर्व नव मतदार तरुण-तरुणींनी या अभियानाचा लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
नवीन मतदार नोंदणी अभियानाच्या अंतर्गत तळेगाव दाभाडे येथे तीन ऑनलाइन नोंदणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. 31 जुलैपर्यंत दररोज सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेत ही केंद्रे कार्यरत राहतील.
तळेगाव दाभाडे येथे बालविकास शाळेसमोर दादा-दादी पार्क, जव्हेरी कॉलनी मैदान व मंत्रा सिटी सेल्स ऑफिस, काकासाहेब खळदे नगर या तीन ठिकाणी नोंदणी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत.
मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड, बॅंक पासबुक (फोटो सह), वाहन परवाना यापैकी कोणताही एक ओळखीचा पुरावा तसेच पत्त्याचा पुरावा म्हणून विजेचे बिल, शिधापत्रिका यापैकी एक, भाडेकरूंसाठी भाडे करारनामा व मालकाचे संमती पत्र यापैकी एक पुरावा सोबत आणणे आवश्यक आहे. 18 ते 25 वयोमर्यादेतील तरुणांनी जन्मतारखेचा पुरावा म्हणून जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला सादर करणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त अर्जासोबत जोडण्यासाठी एक पासपोर्ट आकाराचा फोटो असणे बंधनकारक आहे.
“लोकशाहीमध्ये मतदान हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे.हा हक्क बजावता येण्यासाठी मतदार यादी मध्ये नाव असणे आवश्यक आहे. शहरातील अनेक तरुण-तरुणींनी वयाची 18 वर्षे पूर्ण केल्यानंतरही त्यांची नावे मतदार यादीत नाहीत. अशा सर्व तरुण बंधू-भगिनींनी या अभियानाचा लाभ घेऊन मतदार यादीत आपले नाव नोंदवून घ्यावे व येत्या निवडणुकीत प्रथम मतदानाचा हक्क बजावुन लोकशाही बळकट करण्यासाठी योगदान द्यावे,” असे आवाहन आमदार शेळके यांनी केले आहे.