आंदर मावळ, दि. ११ (प्रतिनिधी – सोपान येवले) : मावळ तालुक्यामधील आंदर मावळचे प्रवेशद्वार आणि मावळ तालुक्यातील श्रीमंत मानली जाणाऱ्या टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायत सध्या कचऱ्याच्या समस्येने त्रस्त आहे. गावाच्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत असून या कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे. सदरचा कचरा लवकरात लवकर उचलावा आणि योग्य ठिकाणी डंपिंग ग्राउंड बनवून कचऱ्याची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
टाकवे बुद्रुक, फळणे व बेलज अशी तीन गावे मिळून टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायत कार्यरत आहे. फळणे व बेलज येथे गायरानाची जागा असताना देखील कचरा व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतला जागेच मुहूर्त मिळत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत टाकवे बुद्रुक मधील संपूर्ण कचरा आंदर मावळ भागात जाणाऱ्या रस्त्याशेजारी टाकला जातोय.
या कचऱ्यात दवाखान्यातील एक्सपायर झालेली औषधे, आठवडे बाजारातील कचरा, चिकनच्या दुकानातील उरलेली घाण, गावातील कचरा, अतीप्रमाणात प्लास्टिक यांचा समावेश आहे. काही दिवसांपासून हा कचरा रस्त्यावर पाहायला मिळत आहे. कचऱ्यावर जनावरे, डुक्करे व कुत्र्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाश्यांना या कचऱ्यामुळे, मोकाट जनावरांमुळे, भटक्या कुत्र्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे.
फळणे येथून टाकवे बुद्रुकला येणारे शाळकरी, विद्यार्थी नागरिक यांच्यासह शहरी भागातून आंदर मावळमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या आरोग्याचा खूप मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. टाकवे बुद्रुक- फळणे मुख्य रस्त्यालगत टाकण्यात येणारा कचरा लोकवस्ती पासून लांब नेऊन त्याची योग्य विल्हेवाट लावावी. अशी मागणी नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे
मच्छर व माशांचा प्रादुर्भाव वाढला :
टाकवे गावातील कचरा, गावामधील चिकनच्या दुकानातील कोंबड्यांची घाण रस्त्यालगत टाकली जात आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी येत आहे. या कचऱ्यामुळे मच्छर, माशा यांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांचे आरोग्यास हानी पोहचण्याची शक्यता आहे.
कुत्री, मोकाट जनावरांमुळे अपघाताची शक्यता :
चिकनच्या दुकानातील आणि आठवडे बाजारातील कचरा हा रस्त्यालगत टाकत असल्याने याठिकाणी भटक्या कुत्र्यांचे प्रमाण जास्त आहे. भटकी कुत्री अनेक वेळा आक्रमकपणे चावण्याचा प्रयत्न करतात. कचऱ्यामध्ये अनेक मोकाट जनावरेही भटकताना दिसतात. त्यांची झुंज झाल्यानंतर रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांवरती ती मोकाट जनावरे धावून जात आहेत. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
नेत्यांचे मौन :
इतक्या गंभीर समस्येवर स्थानिक नेते, पुढारी तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती इच्छुक उमेदवारांनी मात्र मौन बाळगलेले दिसून येते. मतदारांची करमणूक करण्याइतपत स्वतःची कार्यसीमा निश्चित केलेले उमेदवार आणि चमकोगिरी करण्यात गुंतलेले नेते, पुढारी यांमुळे अशा मुलभूत समस्या दुर्लक्षित राहत आहेत, ही शोकांतिका आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षासह तीन स्वीकृत नगरसेवकांची होणार निवड ; मंगळवारी पालिकेची पहिली सभा
– अजित पवारांचा मोठा निर्णय ! एक दोन नव्हे तर तीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती ; पुणे जिल्हा परिषद ताब्यात ठेवण्यासाठी मास्टर प्लॅन
– वडगाव नगरपंचायतीत भाजपाकडून स्विकृत नगरसेवक पदासाठी संदीप म्हाळसकर यांचे नाव जवळपास निश्चित
– मोठी बातमी ! विठ्ठलराव शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
