Dainik Maval News : मावळ तालुक्यातील जवळपास 193 गावांतील 99 हजार 697 शेतकऱ्यांचे डिजिटल स्वाक्षरी असलेले सात-बारा उतारे तयार झाले आहेत. यामुळे तालुक्यातील सात मंडल विभागातील सदरहू शेतकऱ्यांना त्यांचे ऑनलाइन स्वरुपातील व डिजिटल स्वाक्षरी असलेले सात-बारा उतारे सहजरित्या मिळू शकणार आहे. त्यामुळे यापुढे सातबारा उतारा काढण्यासाठी व उताऱ्यावर सही घेण्यासाठी शेतकऱ्यांना तलाठी भाऊसाहेबांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही.
मावळ तालुक्यात सातबारा संगणकीकरण मोहिमेचे काम तहसीलदार विक्रम देशमुख, नायब तहसीलदार गणेश तळेकर व इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून वेगाने हे काम सुरू आहे. डिजिटल सात-बारा उतारा सुविधेमध्ये मावळ तालुका पुणे जिल्ह्यात द्वितीय स्थानावर आहे.
- शासनाच्या भूमिअभिलेख विभागाने शेतकऱ्यांचे सात-बारा, फेरफार, आठ-अ आदी उतारे ऑनलाइन केले आहेत. मात्र, त्यावर डिजिटल स्वाक्षरी नसल्यामुळे नागरिकांना उतारे काढण्यात अडचणी येत होत्या. परिणामी, पारंपारिक पद्धतीने तलाठ्यांकडून सात-बारा उतारे काढावे लागत होते. त्यावरील सहीसाठी भाऊसाहेबांकडे चकरा माराव्या लागत होत्या.
मावळ तहसील प्रशासनाने जलदगतीने सातबारे उतारे डिजिटल सहीसह साक्षांकीत करण्याची मोहीम राबविल्याने आजमितीस जवळपास लाखभर शेतकऱ्यांचे डिजिटल सातबारे तयार असून आता अवघे 967 उताऱ्यांवरील स्वाक्षरीचे काम बाकी आहे. त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांना सातबारा उतारा काढण्यासाठी, फेरफार अथवा आठ-अ मिळण्यासाठी आवश्यक असलेले 15 रुपये शुल्क इंटरनेट बँकिंग, क्रेडिट अथवा डेबिट कार्ड तसेच ‘आरटीजीएस’च्या माध्यमातून द्यावे लागेल व ऑनलाईन सातबारा उतारा मिळविता येईल.
जमिनीची मालकी सद्ध करण्यासाठी सात-बारा उतारा हा महत्त्वाचा दस्तावेज मानला जातो. खोटे सात-बारा उतारे बनवून नागरिकांची फसवणूक करण्याचे अनेक प्रकार या पूर्वी उघडकीस आले आहेत. यासाठी शासनाकडून डिजिटल सातबारा उताऱ्यावर सोळा अंकी पडताळणी क्रमांक उपलब्ध करून दिला जाणार आहे. याद्वारे जमिनीची मालकी व खरेदी-विक्री व्यवहारातील गैरप्रकारांना आळा बसणार आहे.
सोळा अंकी पडताळणी क्रमांक भूमिअभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर टाकला, की संबंधित सात-बारा खरा आहे की खोटा हे समजते. या डिजिटलायझेशन प्रक्रियेमुळे जमिनीच्या नोंदणीतील गैरव्यवहाराला आळा बसणार असून, ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शी होणार आहे. – विक्रम देशमुख, तहसीलदार, वडगाव मावळ
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अभ्यासिकेत अभ्यास केलेले चार विद्यार्थी बनले अधिकारी ; मुख्याधिकाऱ्यांनी केला सन्मान । Talegaon Dabhade
– देहू नगरपंचायतीला यात्रा अनुदान कधी मिळणार? नागरिकांच्या मिळकत करातून होतोय कोट्यवधीचा खर्च । Dehu News
– पिंपरी-चिंचवड शहरासाठी मुळशी धरणातील पाणी आरक्षणाची मागणी ; मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांना निवेदन