जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्येचा ( Kishor Aware Murder Case ) बदला घेण्यासाठी कट रचण्याची हालचाल करणाऱ्या दोघांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केले आहे. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडून 4 पिस्तूल आणि 14 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. प्रमोद सांडभोर आणि शरद साळवी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव असून त्यांना न्यायालयाने दिनांक 1 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अटक करण्यात आलेल्या आरोपी शरद साळवी याच्यावर हत्या, बलात्कार असे गंभीर गुन्हे दाखल असून प्रमोद सांडभोरवर याच्यावर देखील हत्या, हत्येचा प्रयत्न असे एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. या दोघांच्या निशाण्यावर कोण होतं, हे अद्याप समजू शकलेले नाही, याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिस अधिक तपास करत आहेत. ( Pimpri Chinchwad police arrested two accused who were plotting to avenge Kishor Aware Murder )
प्राप्त माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केलेला आरोपी प्रमोद सांडभोर हा तळेगाव येथे जमिनीचे काम करतो, तर शरद साळवी हा दोन महिन्यापूर्वी हत्येच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आला आहे. नुकताच नाशिकच्या कारागृहातून त्यांचा एक साथीदार सुटणार असल्याने ते त्याला भेटण्यास गेले होते. या हालचाली सुरू असताना रात्री त्यांना पिंपरी- चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. आवारे यांच्या हत्येचा बदला घेण्याच्या उद्देशाने हा सर्व खाटाटोप सुरू होता, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. परंतु, ते कुणाला टार्गेट करत होते? त्यांचा प्लॅन काय होता? याबाबत माहिती समोर आली नसून पोलिस याची सखोल चौकशी करत आहेत.
पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमरीश देशमुख, पोलिस कर्मचारी सुमित देवकर, आशिष बनकर, गणेश सावंत, गणेश हिंगे, विनोद वीर, गणेश कोकणे आणि प्रवीण कांबळे यांच्या टीमने ही कामगिरी केली आहे.
किशोर आवारे यांची हत्या आणि तपास….
मे महिन्यात दिनांक 12 मे रोजी किशोर आवारे यांची तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयाच्या गेटसमोर अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण मावळ तालुक्यासह राज्यातही खळबळ माजली. तळेगाव दाभाडे पोलिसांकडे आवारे यांच्या आई सुलोचना आवारे यांनी फिर्याद दाखल केली, ज्यात मावळचे आमदार सुनिल शेळकेंचे नाव आल्याने सर्वत्र खळबळ माजली. पोलिसांनी विशेष तपास पथके आणि एसआयटीच्या माध्यमातून तपास करत या प्रकरणात गौरव खळदे या मुख्य सुत्रधारांसह काही आरोपींना अटक केली आहे, तसेच काही आरोपी फरार आहेत. अशात आतापर्यंत या प्रकरणात हवा तसा तपास होत नसून मुख्य आरोपी मोकाट असल्याचा आरोप करत किशोर आवारे यांच्या आई आणि त्यांच्या समर्थकांनी अनेकदा आंदोलने आणि निदर्शने केलीत, त्यामुळे आता या प्रकरणात आणखीन एक एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.
अधिक वाचा –
– किशोर आवारे हत्या प्रकरणी तपासाबाबत मोठी अपडेट! पोलिस आयुक्तांकडून आणखी एका विशेष पथकाची स्थापना
– कामशेत पोलिसांकडून पंडित नेहरू विद्यालयात जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त विशेष कार्यशाळा