पितृपक्ष आला की कावळा – पितर हा चर्चेचा विषय होतो. अनेकांना यातील शास्त्र काय आहे हे माहित नसते. त्यामुळे ते याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. अनेकजण या गोष्टीची टिंगल देखील करताना दिसतात. त्यामुळे पितृपक्षात श्राद्ध का करतात, या मागचे खरे कारण काय आहे? हे सर्व समजून घेण्यासाठी हिंदू धर्मातील मुळ संकल्पना समजून घेतल्या पाहिजेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सनातन धर्मातील श्रध्देप्रमाणे “आत्मा” हा परमेश्वराचाच अंश आहे. जेव्हा या आत्म्यास त्याच्या या मूळ स्वरूपाचे विस्मरण होते तेव्हा त्यास “जीवात्मा” म्हणजे जीव ही संज्ञा प्राप्त होते. या अज्ञानामुळे जीवात्मा “पुनरपि जननं पुनरपि मरणं, पुनरपि जननी जठरे शयनम्। असे म्हणत या संसार सागरात अनेक म्हणजे 84 लक्ष योनीतुन फिरत रहातो. “या जन्ममृत्युच्या चक्रातुन सुटका करुन घेणे म्हणजे मोक्ष प्राप्ती होणे. जोपर्यंत जीवाला मोक्ष मिळत नाही तो पर्यंत त्यास 84 चा हा फेरा चुकलेला नाही.
- अनेक प्रकारच्या योनीतुन फिरत फिरत जेव्हा जीवास मनुष्य जन्म प्राप्त होतो तेव्हा त्यास त्याच्या विहित कर्माच्या संचितावरुन भोग प्राप्त होतात. आपला जन्म कोणाच्या पोटी होणार हे आपल्या पुर्वजन्माच्या कर्मावरच ठरत असते. ज्या कुळात म्हणजे घराण्यात आपला जन्म होतो, त्या प्रमाणे आपणांस गोत्र प्राप्त होते. आपला जन्म होण्यास दोन कुटुंबाची म्हणजे वडीलांचे आणि आईचे असे दोन भिन्न गोत्रातील कुटुंबीय कारणीभूत असतात. वडीलांचे जे गोत्र तेच मुलांस प्राप्त होते तोच त्याचा वंश असतो.
या दोन्ही कुटुंबातील म्हणजे आईचे माहे व वडीलांचे कुटुंबातील एकुण तिन पिढ्यांतील “आई – वडील”, “आजोबा – आजी”, “पंजोबा – पणजी” व त्यांचे कुटुंब हे आपले पितृ म्हणजेच पितर समजले जातात. यात जीवंत / हयात व्यक्तींचा समावेश केला जात नाही.
पितर हा शब्द “पितृ” संस्कृत या शब्दाचे रुप आहे. प्रत्येक जीवास मृत्युनंतर त्याच्या कर्म गतीप्रमाणे स्वर्ग वा नरक व पितृलोक या स्थानी काही काळ रहावे लागते. शास्त्रामध्ये सात प्रकारचे स्वर्ग आणि 7 प्रकारचे नरक असे 14 लोक सांगितले आहे. गायत्री मंत्र म्हणताना त्यातील उर्ध्वलोकांचे उच्चारण केले जाते. भूलोक, भूवलोक, जनलोक, तपलोक इ. आपण जेथे राहतो ती पृथ्वी म्हणजे भूलोक. या लोकावर भूव: लोक म्हणजे पितृलोक आहे. पितृपक्षात यालोकी राहत असलेले पितर आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी भूलोकात येतात असा समज आहे.
गरूड पुराण आणि कठोपनिषदामध्ये या लोकाचे वर्णन केले आहे. याचे स्थान चंद्राचा जवळ उर्ध्वबाजूस सांगितले आहे. मनुष्याचा गती प्रमाणे त्यांना वेगवेगळ्या लोकात काही काळ रहावे लागते. जेव्हा जीवात्मा त्याचा विहित कार्यकाळ पूर्ण करुन मृत्यु पावतो. तेव्हा त्याच्या गतीप्रमाणे त्यास लोक प्राप्त होतो. परंतु जीवात्मा हा काही वेळा अपघात, आघात, आत्महत्या सारख्या कारणांमुळे अकाली मृत होतो तेव्हा त्यास काही काळ भटकावे लागते. त्यास पुढील गती मिळणे गरजेचे आसते. भटकण्यातून पुढील गतीसाठी तो त्यांच्या वंशातील वंशजाकडे आशेने बघत असतो.
जीवाचे मृत्युनंतर काय होतो? यावर प्राचीन भारतीय ऋषींनी ध्यान, चिंतन करुन संशोधन केले. त्यांच्या दिव्यज्ञानातुन त्यांना पुढील जीवात्माचा प्रवास लक्षात आला. त्याचे वर्णन अनेक पुराणांत आणि उपनिषदांमध्ये दिले आहे. त्यानुसार त्यांनी काही कर्मे शास्त्रात नमुद केली आहेत. ‘प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर देव, पूर्वज आणि ऋषींचे ऋण असते. श्राद्ध केल्याने पितरांच्या ऋणातून मुक्ती मिळते. ती त्यांनी त्याच्या जन्मात फेडलीच पाहिजेत असा दंडक आहे.’ त्यासाठी श्राद्ध हा विधी सांगितला आहे. श्राध्दाचे विविध प्रकार सांगितलेले आहेत. पंचागामध्ये कोणत्या तिथीस कोणते श्राद्ध करावे हे सांगितले आहे.
पितृलोकात राहणाऱ्या आपल्या वंशातील सर्व पितरांना पुढील गती मिळवुन देणे हे आपले कर्तव्य असते. आपल्यावर त्यांचे ऋण असते. त्यासाठी आपण नैमित्यीक कर्माद्वारे, तर्पणाव्दारे, श्राध्दाद्वारे फेडले पाहिजे. जर आपण पितृ लोकात रहाणाऱ्या आपल्या पितरांसाठी अन्न म्हणजे पिंडदान केले नाहीतर, ते कष्टी होतात. त्यांना त्रास झाला तर ते आपल्याला पितृदोष निर्माण होण्यास निमित्त होतात. अनेक जन्मकुंडलीमध्ये पितृदोष सांगितला जातो. त्यासाठी त्रिपिंडी गया श्राद्ध हे उपाय करावे लागतात.
- यंदा दिनांक गुरुवार, दि.19 सप्टेंबर पासून पितृपक्ष सुरु होत आहे. या काळात आपण ज्यांचे वंशज आहोत. आपल्यात ज्यांचा “डीएनए” आहे, अशा आपल्या पूर्वजांना ते जिथे असतील तिथे सुख लाभो या भावनेने आपण केलेले कृत्य हे महालय श्राध्द म्हंटले जाते. आपल्या पूर्वजांविषयी पुज्य भाव ठेवून प्रत्येकाने मनोभावे त्यांना उत्तम गती लाभावी आणि आपल्या कुंटुबाला त्यांनी आशीर्वाद द्यावेत, यासाठी या पितृपक्षात त्यांच्या नावाने एक दिवस उपासना करण्यास काहीही गैर नाही.
वर्षश्राध्द आणि महालय श्राद्ध वेगवेगळे विधी आहेत. वर्षश्राध्द करतो म्हणून पितृपक्षात काहीही विधी न करणारे काही जण असतात. वर्षश्राध्द हे एका विशिष्ट व्यक्तीचे असते. तर पितृपक्षात पितरांचे श्राद्ध असते. त्यामुळे ही दोन्ही श्राद्ध केली पाहिजेत. पितर हे कोणी भूते नसतात तर ते आपलेच पुर्वज असतात. आज आपण जे काही आहोत ते त्यांच्याच मुळे आहोत त्यामुळे प्रत्येकाने या काळात देवाकडे प्रार्थना करुन पितृलोकात रहाणाऱ्या आपल्या सर्व पितरांना त्यांच्या पुढील गती मिळण्यासाठी मनोभावे प्रार्थना करावी. अशात विधी असे काही नसते. त्या मागील भावना ही उदात्त आहे.
भारतीय संस्कृतीत मानवीमूल्ये किती विचारपूर्वक स्थापन केली आहेत. हे आपल्या लक्षात येते. जर आपण पितरांना गतीृसाठी विधी करत असू तर आपल्या हयात सगोसोयऱ्यांसाठीही किती भावनाप्रधान असू याचे हे उत्तम उदाहरण आहे. पुरlणातील कथेनुसार “भगीरथाने” आपल्या पूर्वजांच्या उध्दारासाठी प्रत्यक्ष गंगा स्वर्गातुन पृथ्वीवर अथक प्रयत्न करुन, अनेक वर्ष तपाचरण करुन अवतरीत केली. आपण निदान आपल्या पूर्वजांसाठी एक दिवसाचा श्राध्दविधी का करु नये?
लेखक – अजित दि. देशपांडे (भारतीय विद्यापारंगत, संतविचार अध्यासन)
अधिक वाचा –
– तळेगाव येथील नारायणराव काळोखे नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सभेत सभासदांना लाभांश जाहीर । Talegaon Dabhade
– लोणावळ्यात दिसली सामान्यांची ताकद, आमदार शेळकेंसह सर्वपक्षीयांचा सहभाग, मुख्याधिकाऱ्यांना पाठवलं रजेवर । Lonavala Nagar Parishad
– यावेळी सव्वा लाखाहून अधिकचे मताधिक्य मिळणार ; आमदार सुनिल शेळके यांच्या दाव्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले । MLA Sunil Shelke