Dainik Maval News : पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील मेट्रो प्रकल्प, रस्ते विकास, पाणीपुरवठा आणि नदी शुद्धीकरणाची कामे गतीने पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली. सदस्य उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी सदस्य शशिकांत शिंदे आणि सचिन अहिर यांनी चर्चेत सहभाग घेतला.
मंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट हा मेट्रो मार्ग कार्यान्वित झाला असून पिंपरी-चिंचवड ते निगडी या मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. हे काम जानेवारी 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहेत. शिवाजीनगर ते हिंजवडी (माण) या मेट्रो लाईन-३ प्रकल्पाची लांबी 23.20 किमी असून त्यात 23 स्थानके आहेत आणि या प्रकल्पाचे सुमारे 94 टक्के काम पूर्ण झाले आहे.
पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र प्रकल्प पीपीपी मॉडेलवर उभारला जात असून त्याचा करारही पूर्ण झाला आहे. याशिवाय 55 रस्ते विकास कामांसाठी निविदा काढण्यात आल्या असून निधीअभावी ही कामे थांबणार नाहीत. मावळ तालुक्यातील पाच आणि मुळशी तालुक्यातील चार रस्ते विकास कामेही लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबत बोलताना मंत्री डॉ. सामंत म्हणाले की, औद्योगिक, व्यावसायिक तसेच इतर सांडपाण्यामुळे नदी प्रदूषित झाली असून तिच्या शुद्धीकरणासाठी केंद्र शासनाने सुमारे 1,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हा प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. तसेच पवना नदी शुद्धीकरणासाठी एमएमआरडीए, एमआयडीसी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त सहभागातून काम केले जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पवना प्रकल्पातून 520 एमएलडी आणि आंद्रा प्रकल्पातून 100 एमएलडी पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच आसखेड प्रकल्पातील जॅकवेल, शुद्धीकरण केंद्र आणि पाइपलाइनची कामे प्रगतिपथावर असून नवीन ठेकेदारामार्फत पुढील 10 ते 12 महिन्यांत 167 एमएलडी पाणीपुरवठा सुरू करण्याचे नियोजन असल्याचे मंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळच्या निसर्गाचा विनाश थांबवा ! स्थानिक पर्यावरणमित्रांचे वीज प्रकल्पाविरोधात प्रशासनाला निवेदन ; तीव्र आंदोलनाचा इशारा
– आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून शिळींब येथे आदिम सेवा अभियान अंतर्गत ९५ आदिवासी नागरिकांना जातीचे दाखले वाटप
– गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाच्या एका चुकीने ज्ञानेश्वरीने गमावला जीव ; सोमाटणे फाटा येथील मन सुन्न करणारी घटना
