“पुणे ही छत्रपती शिवाजी महाराज, चाफेकर बंधू यांची भूमी आहे. या भूमीशी ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची प्रेरणा आणि आदर्श जोडलेले आहेत. अशा भूमीत लोकमान्य टिळक यांच्या नावाचा पुरस्कार मिळत आहे ते आपले सौभाग्य आहे, विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यभूमीत मिळणारा पुरस्कार हा आपला सन्मान आहे,” अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ( PM Narendra Modi Conferred With Lokmanya Tilak National Award 2023 In Pune )
स. प. महाविद्यालय येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक, विश्वस्त सुशीलकुमार शिंदे, डॉ. रोहित टिळक, गीताली टिळक, डॉ. प्रणती टिळक आदी उपस्थित होते. स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी…
लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्याची दिशाच बदलली. देशाची संस्कृती आणि परंपरा महान असल्याचा विश्वास लोकांमध्ये निर्माण केला. देश स्वतंत्र होऊ शकतो हा विश्वास लोकांमध्ये त्यांनी पहिल्यांदा निर्माण केला. देशासमोर सहकार्याचे मोठे उदाहरण ठेवले. स्वातंत्र्य लढ्यातील वर्तमानपत्राचे महत्व ओळखून त्यांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्र सुरू केली. स्वातंत्र्यासाठी इंग्रजांसोबत लढा देतानाच समाजातील वाईट प्रथांविरोधातही त्यांनी लढा दिला.
गीतारहस्याच्या माध्यमातून त्यांनी कर्मयोग सोप्या पद्धतीत सांगितला. त्यांचा लोकांवर विश्वास होता. असाच लोकांच्या कर्तृत्वावर प्रामाणिकपणावर आमचाही विश्वास आहे. देशात विश्वासाने भरलेले सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. यामुळेच देश विकासाकडे वेगाने वाटचाल करीत आहे. लोकमान्य टिळकांच्या विचारांमधील देश निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
लोकमान्य टिळकांना समृद्ध, बलाढ्य, कर्तुत्ववान देशाची निर्मिती अपेक्षित होती. त्यासाठी त्यांनी देशामध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण केले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक युवकांनी त्याकाळी स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेतला. त्यापैकी महत्वाचे उदाहरण म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर हे होत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना इंग्लडला जावून बॅरीस्टर होता यावे यासाठी त्यांना शिष्यवृत्ती देण्याची शिफारसही टिळकांनी केली होती.
न्यू इंग्लिश स्कूल, डेक्क्न एज्युकेशन सोसायटी, फर्ग्युसन महाविद्यालयासारख्या संस्थांची स्थापना ही त्यांची दूरदृष्टी दर्शवून देते. या संस्थातून असे कित्येक युवा निघाले ज्यांनी टिळकांचे मिशन पुढे चालवले. राष्ट्रनिर्माणामध्ये आपली भूमिका बजावली. व्यवस्था निर्मितीकडून संस्थांची निर्मिती, संस्था निर्मितीतून व्यक्तीनिर्मिती आणि व्यक्तीनिर्मितीतून राष्ट्रनिर्मिती हे व्हिजन राष्ट्राच्या भविष्यासाठी पथदर्शी असते. त्यावर आज देश प्रभावीपणे वाटचाल करत आहे. देशातील लोकांच्या विश्वासाने आणि प्रयत्नांमुळेच देश आज जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या नावे मिळणाऱ्या पुरस्काराची रक्कम नमामी गंगे प्रकल्पाला देत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली. त्यापूर्वी “लोकमान्य टिळक पुरस्कार हा इंदिरा गांधी, खान अब्दुल गफार खान, शंकर दयाल शर्मा, अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब देवरस, मनमोहन सिंह यांना मिळाला होता. या नेत्यांच्या पंक्तीत नरेंद्र मोदी यांचा समावेश झाला याचा आनंद आहे. देशाच्या जडणघडणीमध्ये लोकमान्य टिळक व महात्मा गांधी यांचे मोलाचे योगदान आहे. नव्या पिढीला या कर्तृत्ववान दृष्टीचा आदर्श अखंडपणे प्रेरणा देईल,” असे खासदार शरद पवार म्हणाले. ( PM Narendra Modi Conferred With Lokmanya Tilak National Award 2023 In Pune )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘दगडूशेठ’ गणपती चरणी लीन; ‘भारत विश्वगुरु व्हावा’ नरेंद्र मोदी यांनी केला संकल्प
– लोणावळा शहरातील नारायणी धाम इथे सुरु असलेल्या श्रीमद भागवत कथा सप्ताहाला राज्यपाल रमेश बैस यांची भेट
– पिंपरी-चिंचवड पोलिसांचा मोक्का पॅटर्न! डोंगरे, परदेशी, मोतीरावे टोळ्यांवर मोक्का, एकूण 24 टोळ्यातील 226 गुन्हेगारांवर कारवाई