Dainik Maval News : राजकारणाचे होणारे गुन्हेगारीकरण किंवा गुन्हेगारांचे होणारे राजकियीकरण ही लोकशाहीला लागलेली कीड आहे. अलिकडच्या काळात सत्तेच्या राजकारणात राजकीय नेत्यांनी गुन्हेगारांचा आसरा घ्यायला सुरुवात केली अन् त्या बदल्यात गुन्हेगारांवर राजकीय वरदहस्त ठेवायला किंवा थेट राजकीय बस्तान बसवून द्यायला सुरूवात केली, राजकारणी आणि गुन्हेगार यांचे हे साटेलोटे लोकशाहीसाठी आणि एकूणच समाजासाठी धोकादायक आहे. त्यामुळे मतदार राजाने जागरुक होऊन राजकारणी व गुन्हेगार यांचे साटेलोटे मोडीत काढून गुन्हेगारांचे होणारे राजकियीकरण थांबविण्याची जबाबदारी आता आपल्या शिरावर घेणे गरजेचे आहे.
राज्यात पुढील काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. गुन्हेगारांचा राजकारणात होणारा शिरकाव हा या निवडणुकांतून होत असतो. नगरसेवक अथवा पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद सदस्य होऊन राजकारणात एन्ट्री करायची आणि गुन्हेगारीचे आपले बस्तान आणखीन घट्ट करायचे ,असा हा कुटील डाव असतो. पैसा आणि सत्ता मिळविण्यासाठी हल्ली राजकारणी देखील अशा गुन्हेगारांना ‘सक्षम उमेदवार’ या पर्यायाखाली आशीर्वाद द्यायला मागे पुढे पाहत नाहीत. खरेतर राजकीय पक्ष, नेते यांनी अशा गुन्हेगारांना पक्ष कार्यालयाच्या दारातून हुसकावून लावले पाहिजे, परंतु तसे होताना दिसत नाही. त्यामुळे आता मतदारांनीच सुज्ञ होऊन अशा गुन्हेगार उमेदवारांना घरी बसविले पाहिजे.
मावळ तालुक्यातील परिस्थिती…
मावळ तालुक्यातील राजकीय परिस्थिती त्यामानाने बरी म्हणावी लागेल, कारण अद्याप मावळच्या राजकारणात गुन्हेगारांना रान मोकळे झालेले नाही. मावळची जनता त्याबाबतीत सुज्ञ व जागरुक आहे. परंतु अलीकडच्या काळात सक्षम उमेदवाराच्या शोधात नेतेमंडळी हळूच निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलून पैशाने मजबूत असणाऱ्या आणि थोडीफार दहशत असणाऱ्या उमेदवाराच्या खांद्यावर हात ठेवू लागल्याने हा विषय मावळकरांसाठीही चिंतेचा बनला आहे. यामुळे मावळच्या जनतेनेही आता मतदार म्हणून आपली भूमिका बजाविताना उमेदवाराचा ‘बायोडाटा’ तपासून पाहायला हवा. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारावर मग तो कोणत्याही पक्षाचा असला तरीही फुल्ली मारून त्याला घराचा रस्ता दाखवायला मतदारांनी मागेपुढे पाहायला नको.
मतदारांनो.. हे काम नक्की करा !
1. प्रत्येक उमेदवाराच्या पार्श्वभूमीची माहिती जाणून घ्या.
2. काम केलेल्या आणि करणाऱ्या उमेदवाराला पसंती द्या.
3. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराला थेट नाकारा.
4. पक्षासोबतच उमेदवार योग्य आहे की नाही, हेही पाहा.
5. पैसा, दहशत यांना भीक न घातला लोकशाहीचे रक्षण करा.
6. मतदान हे गुप्त असल्याने योग्य उमेदवाराला मतदान करा.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर शक्य नाही ; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
– मावळातील नुकसानग्रस्त भातउत्पादक शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या ; महाविकासआघाडीचे तहसीलदारांना निवेदन
– लाडक्या बहिणींनो… 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा…
– अवकाळीचा फेरा, भिजला भाताचा पेरा ! मावळातील नुकसानग्रस्त भात उत्पादकांना भरपाई देण्याची NCP ची मागणी



