Dainik Maval News : महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या लोणावळा शहरालगतच्या कार्ला वेहेरगावच्या डोंगरात वसलेल्या आई एकवीरा देवीच्या चैत्री यात्रेला गुढीपाडव्यापासून सुरुवात होणार आहे. चैत्र शुद्ध नवमीपर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे.
आई एकवीरा देवीच्या चैत्र यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक या ठिकाणी येत असतात. मागील महिनाभरापासून यात्रेच्या नियोजनाची तयारी सुरू आहे. श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून व महाराष्ट्र शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत या ठिकाणी विकास कामे देखील सुरू आहेत. भाविकांच्या सुलभतेसाठी पायऱ्यांच्या रुंदीकरणाचे काम देखील प्रगतीपथावर आहे तसेच गडावरील इतर कामे सुरू आहेत. यात्रेच्या पार्श्वभूमीवर ही कामे तात्पुरती बंद ठेवत यात्रा झाल्यानंतर पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
यात्रा काळामध्ये आई एकविरा देवीच्या गडावर लाखो भाविक येत असतात. येणाऱ्या भाविकांना पायऱ्यांवरून ते जा करत असताना कोणताही त्रास होऊ नये याकरिता हार फुलांची दुकाने मागे घेण्यात आली असून पायऱ्यांचा संपूर्ण परिसर व अतिरिक्त जागा ही भाविकांना गडावर येण्यासाठी व खाली उतरण्यासाठी मोकळी करण्यात येत आहे.
आई एकवीरा देवीचे पाच पायरी मंदिर ते लेणीच्या गेटपर्यंत सहा मीटर रुंदीच्या पायऱ्या करण्यात येणार आहेत. त्या पद्धतीचे मार्किंग देखील व्यवसायिकांना करून देण्यात आले असून सर्व हार फुल व प्रसाद विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांनी देखील श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या विनंतीला मान देत आपले दुकाने मागे घेत पायऱ्या रुंदीकरणाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे भविष्यात आई एकवीरा देवीच्या गडावर जाण्यासाठी व खाली येण्यासाठी प्रशस्त अशा पायऱ्या या ठिकाणी तयार होणार आहेत. ज्या ठिकाणी सरळ चढण आहे त्या ठिकाणी देखील काहीसा बदल करत सहजरीत्या नागरिकांना पायऱ्या चढता येतील अशा पद्धतीच्या पायऱ्या बनवण्यात येणार असल्याचे श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांनी सांगितले.
यात्रेच्या तयारी विषयी बोलताना दीपक हुलावळे म्हणाले, यात्रा काळामध्ये भाविकांच्या सुलभदर्शनाला प्राधान्यक्रम दिला जाणार आहे. कमीत कमी वेळेमध्ये भाविकांना देवीचे दर्शन कसे होईल याकरिता नियोजन सुरू आहे. गुढीपाडव्यापासून देवीच्या चैत्र यात्रेला सुरुवात होत असली तरी षष्ठी, सप्तमी, अष्टमी व नवमी हे चार दिवस गडावर भाविकांची मोठी संख्या असते. या काळात विशेष नियोजन तसेच पोलीस प्रशासन व तालुका प्रशासन यांच्याशी समन्वय साधत अधिकचा बंदोबस्त गडावर तैनात ठेवण्यात येणार आहे.
पिण्याचे पाणी, शौचालय, लाईटची सुविधा, मदत कक्ष, पोलीस मदत कक्ष, वैद्यकीय कक्ष, वाहन तळ सुविधा यांची उभारणी करण्यात येणार आहे. भाविकांची येथे आल्यानंतर कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट सर्व विश्वस्त मंडळ याकरिता सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस प्रशासनाकडून आई एकवीरा देवीच्या गडाची व परिसरातील सर्व भागांची पाहणी करण्यात आली असून वाहने उभे करण्यासाठी वाहनताळांची उभारणी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळच्या निसर्गाचा विनाश थांबवा ! स्थानिक पर्यावरणमित्रांचे वीज प्रकल्पाविरोधात प्रशासनाला निवेदन ; तीव्र आंदोलनाचा इशारा
– आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून शिळींब येथे आदिम सेवा अभियान अंतर्गत ९५ आदिवासी नागरिकांना जातीचे दाखले वाटप
– गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाच्या एका चुकीने ज्ञानेश्वरीने गमावला जीव ; सोमाटणे फाटा येथील मन सुन्न करणारी घटना


