Dainik Maval News : पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या अखत्यारित असलेली मावळ तालुक्यातील वडगाव, कामशेत, लोणावळा शहर आणि लोणावळा ग्रामीण ही चार पोलीस ठाणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाशी जोडण्यास गृह विभाग सकारात्मक नसल्याची माहिती समोर येत आहे.
काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत लोणावळा शहर आणि ग्रामीण हद्दीतील पर्यटनाबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला. त्यानुसार लोणावळा शहरात नव्याने पर्यटकांसाठी पर्यटक पोलीस ठाणे सुरू करण्याचे नियोजन आहे. यामुळे लोणावळा शहर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीबाहेर राहणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात 22 ठाणी
15 ऑगस्ट 2018 रोजी पुणे शहर व पुणे ग्रामीण दलाची विभागणी करून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले. सुरुवातीला आयुक्तालयाच्या हद्दीत 14 पोलीस ठाणी होती. त्यानंतर चिखली, रावेत, शिरगाव आणि म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे मंजूर झाले. काही महिन्यांपूर्वी वाकड, हिंजवडी, पिंपरी आणि भोसरी या पोलीस ठाण्यांचे विभाजन करून नव्याने अनुक्रमे काळेवाडी, बावधन, संत तुकारामनगर आणि दापोडी पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. या आयुक्तालयांतर्गत आता 22 पोलीस ठाणी आहेत.
एकीकडे आयुक्तालय हद्दीतील वाढती गुन्हेगारी रोखण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांना अपयश येत असतानाच ग्रामीण हद्दीतील वडगाव, कामशेत, लोणावळा शहर आणि लोणावळा ग्रामीण ही चार ठाणी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाला जोडण्याचा प्रस्ताव गृह विभागाला पाठविला असल्याची माहिती समोर आले. या प्रस्तावाला मावळ तालुक्यातूनही मोठा विरोध झाला.
सध्या असलेल्या हद्दीतही गुन्हेगारी वाढली
पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे एकूण क्षेत्रफळ 115 चौरस किमी इतके असून अंदाजे 40 लाख इतकी लोकसंख्या येते. पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पुणे ग्रामीणपेक्षा भौगोलिकदृष्ट्या पिंपरी-चिंचवडची हद्द मोठी आहे. पिंपरी-चिंचवड शहर, पुण्यातील बावधन, बालेवाडी, ग्रामीणमधील चाकण, खेड, आळंदी, तळेगाव दाभाडे हा परिसर आयुक्तालयांतर्गत येत आहे. आळंदी-मरकळ, तळवडे, भोसरी, चाकण, हिंजवडी, तळेगाव दाभाडे ही औद्योगिक क्षेत्रे आयुक्तालयाच्या अखत्यारित येतात. आयुक्तालयाच्या हद्दीत मोठा ग्रामीण भाग येतो. सध्या या भागातही पायाभूत सुविधा, ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे गुन्हेगारांना पकडण्यात अडचणी येतात. अशात नवा भाग जोडल्यास तिथे पिंपरी-चिंचवड आयुक्तालय किती यशस्वी होइल, याबाबतही शंका आहे.
पुणे ग्रामीण पोलीस दलाने ग्रामीण भागातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी गस्त वाढविली आहे. ग्रामरक्षक दलाचीही याकामी मदत होते. तडीपार, झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत ग्रामीण भागात 1300 गुन्ह्यांनी घट झाल्याचा दावा ग्रामीण पोलिसांनी केला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाबाबत नवीन डेडलाईन ; 10 एप्रिलपर्यंत भूसंपादन पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश । Lonavala News
– संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सोहळा ; भंडारा डोंगर येथे आजपासून गाथा पारायण व कीर्तन महोत्सव
– रसायनमिश्रीत सांडपाणी नदीत सोडणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई ; पवना, इंद्रायणी नदी प्रदूषणावर पर्यावरण मंत्र्यांची भूमिका