Dainik Maval News : गेली अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या तळेगाव ते उरळी दरम्यान रेल्वेच्या बाह्यवळण मार्गाचा डीपीआर तयार झाला असून, हा डीपीआर रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने केला आहे. तब्बल ८०.५१ किलोमीटरचा रेल्वे मार्ग दुहेरी असून, तिसरी व चौथी मार्गिका असणार आहे. या मार्गावर नऊ रेल्वे स्टेशन असणार आहेत. या प्रकल्पानंतर पुणे जिल्ह्यातील रेल्वे जाळे अधिक सक्षम आणि गतिमान होणार आहे.
रेल्वे मंत्रालयाकडून पुणे जिल्ह्यात विविध रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण, रेल्वे मार्गिका वाढविणे, तसेच हडपसर आणि खडकी टर्मिनलची कामे सुरू आहेत. पुणे रेल्वे स्टेशनचा विकास करून फलाटांची लांबी आणि संख्या वाढविण्यात येणार आहे. या प्रकल्पाबरोबरच रेल्वे मार्ग वाढविण्याचे नियोजन केले आहे.
पुणे ते मुंबई तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. रेल्वे मंत्रालयाने जाहीर केल्याप्रमाणे व्यस्त मार्गावर तिसरी व चौथी मार्गिका करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यानुसार तळेगाव ते उरळी आणि पुणे ते वाडीदरम्यान तिसरी व चौथी मार्गिका केली जाणार आहे.
तळेगाव ते उरळी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी चार वर्षे लागणार असून, प्रस्तावित रेल्वे मार्गावर १६० किलोमीटर प्रतितास गाडीची वेग मर्यादा असेल. हा प्रकल्प मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी ४९९.९६ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. त्यापैकी ४५३.१६ हेक्टर खासगी, १०.४३ हेक्टर सरकारी, आणि ३६.१७ हेक्टर वनजमीन आहे.
या मार्गावर न्यू तळेगाव, वराळे, संत तुकाराम महाराज, कुरुळी (चाकण), संत ज्ञानेश्वर महाराज, वाघोली, कोलवडी, कुंजीरवाडी कॅबिन, उरळी (बायपासमार्गे) असे स्टेशन असणार आहेत. त्यामध्ये न्यू तळेगाव रेल्वे स्टेशन मोठे असणार आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात आमसभा आयोजित करण्याची मागणी ; शिवसेनेकडून प्रशासनाला निवेदन । Maval News
– वडगावातील तरूणाईत वाढत्या व्यसनाधीनतेमागे शहरातील अवैध धंदे ; पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी
– पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी बिगर कर्जदार आणि कर्जदार शेतकऱ्यांसाठी मुदतवाढ ; जाणून घ्या