मावळ प्रांताच्या राजमाता म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या थोर महाराणी म्हणजेच अहिल्याबाई होळकर ( Rajmata Ahilyabai Holkar ) यांची आज जयंती. आपल्या कार्यकाळात राणी अहिल्यादेवी यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले आणि त्यांचा जीर्णोद्धारही केला. ‘सर्वांना समान न्याय’ या त्यांच्या बाण्यामुळे अहिल्याबाई होळकर यांच्या न्यायप्रियतेची ख्याती सर्व दूर पसरलेली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अहिल्याबाईंचा जन्म ‘चौंडी, बीड’ इथे माणकोजी व सुशिलाबाई शिंदे या दांपत्यापोटी झाला. धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकरांच्या मुलाशी ‘खंडेरावांशी’ झाले. खंडेरावांपासून अहिल्याबाईंना मालेराव व मुक्ताबाई ही दोन अपत्ये झाली. खंडेराव हे कुंभेरीच्या लढाईत मरण पावले, तेव्हा अहिल्याबाईंना वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी वैधव्याला सामोरे जावे लागले. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या, पण सासरे मल्हारराव यांनी त्यांना थांबवले. ‘प्रजाहितासाठी सती जाऊ नये, हे राज्य सांभाळायचे आहे’ असे म्हटले. तेव्हा सासऱ्यांच्या इच्छेचा अहिल्याबाई होळकरांनी मान राखला आणि सती न जाता राज्यकारभारावर लक्ष केंद्रित केले.
‘पुण्यश्लोक’ राजमाता अहिल्याबाई होळकर या पहिल्या स्त्री होत्या, ज्यांनी स्त्रियांची सेना बनवून नारी शक्तीचा परिचय जगाला करून दिला. त्या एक अतिशय योग्य शासक व संघटक होत्या. न्यायप्रिय, पराक्रमी योद्धा, आणि सर्वश्रुत धनुर्धर यात पारंगत होत्या. होळकर घराण्याचा ‘तत्वज्ञानी राणी’ म्हणून त्यांचा परिचय होता.
राणी अहिल्यादेवी यांनी तत्कालीन राज्यकारभारात अनेक बदल घडवून आणले. पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार सुधारणा केल्या. करपद्धती सौम्य केली; गावोगावी न्याय देणारे पंच अधिकारी नेमले. नदी घाट बांधले, त्यावरील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. अनेक देवळांच्या आश्रयदात्या बनल्या. मंदिरांसाठी काम करूनही त्यांनी धर्माच्या नावाखाली असलेल्या अनेक रूढ, अनिष्ट प्रथांना छेद दिला.
काळाची पावले ओळखणार्या कुशल प्रशासक, प्रजाहितदक्ष, कर्तृत्ववान आणि कार्यक्षम शासनकर्त्या ‘पुण्यश्लोक’ राजमाता अहिल्याबाई होळकर यांची आज (31 मे) जयंती, त्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.
अधिक वाचा –
– ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत मावळ तालुक्यातील 3 हजार 68 नागरिकांना विविध सेवा आणि योजनांचा लाभ
– आंदर मावळातील खांडी गावात जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त कार्यक्रम; 85 महिला आणि मुलींचा समावेश