Dainik Maval News : भारताची अवकाश संशोधन संस्था ‘इस्त्रो’ आणि अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ दोन्ही अंतराळ संशोधन केंद्र अभ्यास दौऱ्याच्या निवडीसाठी पहिली चाळणी परीक्षा मावळ तालुक्यातील सात केंद्रावर उत्साहात पार पडली. सदर परीक्षेला मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता सहावी आणि सातवीचे एकूण ५३४ विद्यार्थी बसले होते, अशी माहिती सहाय्यक गटविकास अधिकारी सेवक थोरात आणि गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांनी दिली.
- तालुक्यातील कार्ला, पवनानगर, दारुंब्रे, उर्से, माळवाडी, भोयरे, कान्हे या सात परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा सुरळीत पार पडली. तीन टप्प्यांत ही निवड प्रक्रिया राबविण्यात येत असून तिन्ही टप्प्यात गुणवत्ता प्राप्त करून अंतिम तोंडी परीक्षेतून ७५ विद्यार्थी निवडले जाणार आहेत. त्यातील २५ विद्यार्थी ‘नासा’, तर ५० विद्यार्थी ‘इस्रो’ भेटीसाठी पाठवले जाणार आहेत.
जिल्हा परिषद ‘नासा’ भेटीसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी साडेसात लाख रुपये तर ‘इस्रो’ भेटीसाठी निवड होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ७५ हजार रुपये खर्च करणार आहे. खगोल शास्र भौतिकशास्त्र केंद्राकडून (आयुका) परीक्षेचा अभ्यासक्रम ठरविण्यात आला असून पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत अशा तीन टप्प्यांत ही निवड प्रक्रिया होणार आहे. तर प्रश्नपत्रिकेत भौतिक, रसायन, जीव व खगोलशास्त्र या चार विषयांवर ही परीक्षा घेण्यात आली.
पुणे जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान, सहाय्यक गटविकास अधिकारी सेवक थोरात व गट शिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांची जोरदार तयारी करून घेतली होती.
तालुक्यातील वराळे येथील दिशा फाऊंडेशन व तळेगाव येथील अगत्य फाउंडेशनच्या सहकार्याने त्यांच्या सायन्स लॅबमध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंग देऊन काही विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यात आली असल्याची माहिती देखील गट शिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांनी दिली. या परीक्षा आणि तयारीचा उपयोग केवळ इस्रो व नासा भेटीसाठी निवड इतकाच न राहता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी. त्यांना वैज्ञानिक बनविण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे, असे गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांनी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– गुरुपौर्णिमा विशेष : गुरुंनी पैलू पाडून घडवला लख्ख हिरा ! दिग्गज गुरुंच्या छायेत एक उत्तम कथक नर्तक म्हणून तो नावारुपाला आलाय
– मोठी बातमी! तुकडेबंदी कायदा रद्द होणार, महसूल मंत्र्यांची घोषणा; राज्यातील लाखो शेतकरी, सामान्य नागरिकांना मोठा दिलासा
– अरुंद रस्ता.. खड्ड्यांचे साम्राज्य.. वाहतूक कोंडी अन् नियोजनाचा अभाव ! तळेगाव – चाकण रस्त्यावरील प्रवास ठरतोय शिक्षा