Dainik Maval News : वडगाव मावळ येथील सत्र न्यायालयाच्या सरकारी अभियोक्ता आर. एन. विरकुड यांनी लोणावळा महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत आलेल्या नवीन फौजदारी कायद्यांबद्दल माहिती दिली. या नवीन कायद्यांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याने न्याय मिळण्याची प्रक्रिया जलद व सुलभ झाल्याचे त्या म्हणाल्या.
लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या सहयोगाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात सहाय्यक सरकारी अभियोक्ता आर. एन. वाणी, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप, लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे उपाध्यक्ष दत्तात्रय पाळेकर, महाविद्यालय विकास समिती सदस्य विशाल पाडाळे, प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
- विरकुड म्हणाल्या, “मागील वर्षीपर्यंत सुरू असलेले ब्रिटिश कालीन कायदे गुन्हेगारी रोखण्यासाठी नाही तर सत्ता केंद्र राखण्यासाठी बनविले गेले होते. केंद्र सरकारने या कायद्यात बदल करत नवीन कायदे तयार केले आहेत. 1 जुलै 2024 पासून हा नवीन कायदा अमलात आला आहे. या नवीन कायद्यांमुळे न्यायव्यवस्थेत समाजातील लोकांना सामावून घेतले आहे आणि पिडीत नागरीकांना न्याय मिळणे सुलभ झाले आहे.”
नवीन कायद्यांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याने न्याय प्रक्रिया जलद गतीने होत आहे, असे त्या म्हणाल्या. “पूर्वी न्याय लवकर मिळत नव्हता, पण आता न्याय लवकर मिळणार आहे. सामान्य जनतेला समोर ठेवून हे नवीन कायदे बनवण्यात आले आहेत. जुन्या कायद्यातील त्रुटी दूर करत नवीन कायदे बनवण्यात आले आहेत,” असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेले विविध ड्रग्ज सेवन कसे घातक आहे याची माहिती देत कोणत्याही नशे पासून दूर राहण्याचा सल्ला दिला. तसेच नवीन वाहन कायद्याची माहिती देखील विद्यार्थ्यांना दिली. दत्तात्रय पाळेकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेल्या मोबाईलच्या अति आणि चुकीच्या वापराबाबत चिंता व्यक्त केली. प्राचार्य डॉ. देशमुख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर प्राध्यापक काटकर यांनी सूत्रसंचालन केले. विशाल पाडाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देहू नगरपंचायतीचा 97 कोटी 99 लाखाचा अर्थसंकल्प सादर, विशेष सभेत अर्थसंकल्प मंजूर । Dehu News
– तळेगाव-चाकण महामार्गाच्या कामाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळावी ; कृती समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन । Maval News
– मोठी बातमी ! ‘पीएमआरडीए’चा मोठा निर्णय, आता नऊ तालुक्यांत होणार PMRDA चे कार्यालय, मावळचाही समावेश