Dainik Maval News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मावळ दौऱ्यातील कान्हे सभेत मावळ-मुळशी तालुक्यातील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याविषयी बोलताना कारखान्याचे अध्यक्ष व माजी खासदार विदुरा तथा नानासाहेब नवले यांना थेट निवृत्तीचा सल्ला जाहीररित्या दिला. त्यांच्या या विधानाची आता जोरदार चर्चा होत असून विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या वक्तव्याकडे पाहिले जात आहे.
कान्हे उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण आणि ग्लास स्काय वॉक प्रकल्प कुरवंडे सह इतर महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या भूमिपूजनसाठी अजित पवार हे शुक्रवारी (दि.) मावळात आले होते. यावेळी कान्हे येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यासभेत बोलताना अजित पवार यांनी संत तुकाराम सहकारी कारख्यान्या विषयी भाष्य केले. यावेळी व्यासपीठावर आमदार सुनिल शेळके, माजी आमदार रुपलेखा ढोरे, माऊलीभाऊ दाभाडे आदी मान्यवर होते.
असा आला मुद्दा भाषणात –
दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर सात रुपये अनुदान देण्याचा निर्णय महायुती शासनाने घेतला. त्यामुळे गाईच्या दुधासाठी आता शेतकऱ्यांना 35 रुपये भाव मिळणार आहे, असे सांगत अजित पवार यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाला हात घातला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही चांगला भाव मिळाला पाहिजे, असे मत मांडताना त्यांनी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याने ऊसाला काय भाव दिला, असा जाहीर सवाल केला.
त्यावेळी उपस्थितांनी 2,960 रुपये असे उत्तर दिले. हाच धागा पकडत अजित पवार यांनी, आमच्या बारामती तालुक्यात सोमेश्वर सहकारी कारखान्याने प्रती मेट्रीक टन 3,771 रुपये तर माळेगाव सहकारी कारखान्याने प्रती मेट्रीक टन 3,636 रुपये भाव दिलाय, असे सांगितले. साखर कारखाना असा चालवायचा असतो. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळालाच पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
याला जोडूनच, नाना आपण साखर कारखाना स्थापन केलात. आम्हाला आपल्याविषयी आदर आहे. पण आता तुम्ही वयस्कर झालात. आता कारखान्याची जबाबदारी तरुणांकडे द्या, या शब्दांत अजित पवार यांनी नानासाहेब नवले यांना थेट निवृत्तीचा सल्ला दिला. परंतु अजित पवारांची ही विधाने आगामी विधानसभा निवडणूक आणि त्याला जोडून असणाऱ्या राजकारणाबद्दल होती अशी आता चर्चा आहे. यातही साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांना जवळ करण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आई माऊलीचा उदो उदो… कार्ला गडावर गर्दीचा उच्चांक, एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांचा महापूर । Karla News
– अभिनंदन ! मावळचे सुपुत्र डॉ. पद्मवीर थोरात यांची वैद्यकीय अधिकारी ‘गट अ’ पदी निवड । Maval News
– आता सोडणार नाही रे मौका, रवि आप्पाचा वादा पक्का – गीत लॉन्च करत विधानसभा लढविण्याचा निर्धार