Sensitive landslide prone villages in Maval Taluka : पावसाळा म्हटलं की निसर्ग सौंदर्याची उधळण पाहायला देशभरातील पर्यटक मावळ तालुक्याकडे ओढ घेतात. मावळ तालुक्याच्या कानाकोपऱ्यात निसर्गाचे आगळेवेगळे रूप पाहायला पर्यटकांची गर्दी होत असते. परंतू याच मावळात सह्याद्री पर्वत रांगेतील डोंगरांच्या पायथ्याशी वसलेली काही गावे आहेत, जी जीव मुठीत धरून जगत आहेत. दरडींच्या छायेत येथील नागरिक आपले जीवन जगत असून अनेक वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळात 19 गावे धोकादायक –
सन 2014 मध्ये माळीण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील गावांचा सर्वे करण्यात आला होता. त्यामध्ये मावळ तालुक्यातील बोरज, माऊ, गबालेवाडी, मोरमारवाडी, भूशी, कळकराई, मालेवाडी, तुंग, लोहगड, ताजे, पाले ना.मा., नायगाव, साई, वाऊंड, सावळे, टाकवे खुर्द, शिलाटणे, सांगिसे, नेसावे ही गावे धोकादायक असल्याचे नमूद आहे. ( Sensitive landslide prone villages in Maval Taluka Boraj Kalkarai Bhushi Mau Tung Malewadi Taje Lohgad )
ही 8 गावे संवेदनशील –
मावळ तालुक्यातील माळीण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर GSOI + GSDA + CEOP संस्थेकडून सर्वेक्षण करण्यात आले. त्या सर्व्हेक्षणात आढळून आलेलली भूस्खलन संवेदनशील 8 गावे खालीलप्रमाणे,
1. बोरज, 2. कळकराई (सावळा) 3. भुशी, 4. माऊ, 5. तुंग, 6. मालेवाडी, 7. ताजे, 8. लोहगड
- बेसूमारपणे झाडांची होणारी कत्तल, डोंगर-टेकड्यांवर होणारे अवैध उत्खनन, मुरूम-मातीची राजरोजपणे होणारी चोरी, धनदांडग्यांनी पैशाच्या जोरावर प्रॉपर्टी डेव्हलप करण्यासाठी डोंगरांवर झाडतोड करून आणि उत्खनन करून बांधलेले बंगले, नैसर्गिक प्रवाहांची अडवणूक किंवा त्यांचा दिशाबदल ही सर्व कारणे मावळातील या गावांच्या मुळावर उठली आहे. या ना त्या कारणाने डोंगरांचा अर्थात निसर्गाचा समतोल बिघडल्याने येथील डोंगर दरडी कोसळण्याच्या उंबरठ्यावर आहेत. आणि त्यामुळे येथील सामान्य नागरिक ग्रामस्थ आपला जीव धोक्यात घालून जीवन जगत आहे.
प्रशासनाकडून राबवण्यात आलेल्या उपाययोजना – (तहसील कार्यालयाची माहिती)
1. तहसिल कार्यालय मावळ येथे 24×7 नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्यामध्ये कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे व नियंत्रण कक्षातील संपर्क क्रमांक प्रसिध्द करण्यात आलेला आहे.
2. पावसाच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक मंडळ भागामध्ये 1 या प्रमाणे मावळ तालूक्यामध्ये एकूण 7 ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आलेले आहेत. सदर पर्ज्यनमापक यंत्रावरील पावसाची आकडेवारी वरून आपत्तीची तीत्रता लक्ष्यात येते
3. मावळ तालूकयातील प्रत्येक गावांचा गाव आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला असून त्यावरून तालूका आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आलेला आहे त्यामुळे आपत्तीच्या काळात तात्काळ मदत करणे शक्य होते.
4. आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने तालूक्यातील सर्व यंत्रणा यांची वारंवार आढावा बैठक घेऊन ‘पावसाळयापुर्वीची कामे, केलेल्या उपया योजना तसेच आपत्तीच्या कालावधीमध्ये घेवायाची खबरदारी याबाबत सुचना दिवून वेळोवेळी आढावा घेण्यात आलेला आहे.
5. आपत्तीच्या कालावधीमध्ये वादळामुळे वीजेचे खांब कोलमडून विदयुत पुरवठा खंडीत होतो व त्यामुळे गावांचा संपर्क तुटतो अशावेळी तात्काळ व्यवस्था करणे बाबत विदयुत विभाग यांना सुचना दिलेल्या आहेत.
“मावळ तालुक्यात भूस्खलनाचा धोका असलेल्या 19 गावांपैकी बोरज, कळकराई (सावळा), भुशी, माऊ, तुंग, मालेवाडी, ताजे आणि लोहगड ही 8 गावे संवेदनशील असल्याचे सर्व्हेत आढळून आले आहे. या गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्रत्येक गावाचा गाव आपत्ती व्यवस्थापन आराखडा बनवण्यात आला असून तालुका आपत्ती व्यवस्थापन आराखडाही बनवण्यात आला आहे. यासह दिनांक 11 जून रोजी बैठक घेऊन सर्व विभाग प्रमुखांना नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने तसेच ग्रामस्तरीय आपत्ती व्यवस्थापन बैठकींचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.” – श्री. गणेश तळेकर (निवासी नायब तहसीलदार, मावळ तालुका)
अधिक वाचा –
– कान्हे येथे मावळमधील विणेकऱ्यांचा सन्मान ; ‘वारकऱ्यांना सन्मानित करण्याची सेवा आमदार सुनिल शेळके दरवर्षी करतात हे कौतुकास्पद’
– ‘ज्यांनी मते दिली त्यांचा आणि नाही दिली त्यांच्यासह सर्वांचा मी लोकप्रतिनिधी.. कसलाही दुजाभाव करणार नाही’ – खासदार श्रीरंग बारणे
– शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ; वाचा योजनेची उद्दिष्ट्ये, वैशिष्ट्ये आणि जोखमीच्या बाबी