शांता शारदचंद्रसुंदरमुखी शाल्यन् भोज्यप्रिया,
शाकैः पालीतविष्टपा शाकोल्लद्विग्रहा,
शामांगी शरणागतातिर् शमनी
शक्रादिभी : शंसिता,
शंकर्यष्टफलप्रदा भगवती शाकंभरी पान्तुमाम
सर्वप्रथम नाथ सद्गुरूंना व शाकंभरी देवीला वंदन. पौष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा किंवा पौष पौर्णिमा असेही म्हणतात या दिवशी शाकंभरी देवीची विधीपूर्वक पूजा केली जाते. हा शाकंभरी नवरात्रीचा शेवटचा दिवस, दक्षिण भारतात शाकंभरी मातेला बनशंकरी देवी म्हणूनही ओळखले जाते. शाकंभरी हे पार्वतीचे रूप आहे. पौष महिन्यातील पौर्णिमेला शाकंभरी देवीने हा अवतार घेतला होता, म्हणूनच या दिवसाला शाकंभरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. ( Shakambhari Purnima 2023 Know Puja Vidhi Significance And Celebrations Related To Last Day Of Shakambhari Navratri )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
हिंदू पंचांगानुसार शाकंभरी नवरात्रीची सुरुवात अष्टमी अथवा सप्तमी तिथी पासून होते आणि पौष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी समाप्ती होते. अनेकांची कुलदेवी असलेली ही देवी शीघ्रफलदायीनी म्हणून पुराण काळापासून प्रसिद्ध आहे. यानिमित्त दीपोत्सव रथोत्सव केला जातो. कर्नाटक राज्यात विजापूर शहराजवळ बदामी इथे या देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. बदामीच्या तीर्थस्थानी असलेली देवीची मूर्ती अष्टभुजाधारी असून ती सिंहारूढ आहे. काळ्या पाषाणातील मूर्ती भव्य आणि जागृत आहे. देवीच्या उजव्या हातामध्ये खडग, घंटा, त्रिशूल व वेद आहेत. तर डाव्या हातामध्ये पानपात्र, मुंड, ढाल व डमरू आहे. देवीची मूर्ती सालंकृत आहे. गळ्यात हार असून अंगा खांद्यावर नवरत्नांचा माळा आहे. देवीच्या मुखावर प्रसन्न भाव असून पूजा अर्चना यामुळे आलेले दिव्यत्व जाणवते.
देवी भागवतामध्ये देवी शाकंभरीच्या उत्पत्तीची कथा आहे. प्राचीन काळी एकदा आपल्या देशात अनेक वर्ष पाऊसच पडला नाही. सर्व प्राणी जीवसृष्टी अन्य पाण्यावाचून व्याकुळ झाली. ऋषी देवाधीकांची कामे बंद पडली. सर्वदेव हताश होऊन देवादिदेव महादेवा जवळ गेले महादेव म्हणाले केवळ आदिशक्तीच हे काम करू शकते. भगवान शंकर व सर्व शिष्य, भक्तगण भगवतीकडे आले आणि तिची करुणायुक्त भावाने प्रार्थना करू लागले. हे जगनमाते अनेक वर्ष आवर्षण झाल्यामुळे सर्व प्राणी तहानेने व्याकूळ भुकेने तडफडत आहे. आम्हा सर्वांची तू माता आहेस, तू या सृष्टीवर दया कर जीवन म्हणजेच पाणी देऊन सृष्टीच्या प्राण्यांचे रक्षण कर. तुझ्याच कृपेने हे जग निर्माण झाले आहे, तेव्हा हे जगत जननी तू आम्हा सर्वांचे रक्षण कर.
ही आर्त हाक ऐकून दयाळू असलेल्या देवीने पर्जन्यवृष्टी केली व स्वतःच्या शरीरातून अनेक प्रकारच्या भाज्या निर्माण करून सर्वांच्या जीवनाचे रक्षण केले. लोकांनी त्या पालेभाज्यांचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद म्हणून भक्षण केला व दुष्काळ संपला. त्या प्रसंगाची आठवण म्हणून अजूनही हा कुलधर्म पाळला जातो. शक्य त्या सर्व भाज्यांचा नैवेद्य देवीला अर्पण केला जातो, शाक म्हणजेच भाज्या आणि म्हणूनच देवीला शाकंभरी असे नाव पडले. ते प्रत्यक्ष पार्वती म्हणजेच शंकरी आणि वनात राहत असल्यामुळे ती बनशंकरी म्हणूनही प्रसिद्धीस पावली.
आरोग्य रक्षणासाठी आहारातील विविध भाज्यांचे असणारे महत्त्व आपण जाणतोच. विविध प्रकारच्या भाज्यावर या नवरात्र मध्ये आपण आपल्या आहारात समाविष्ट करू, तसेच इतरांनाही दान स्वरूपात ते देवू. हा संकल्प आरोग्याच्या दृष्टीने व्रत म्हणून याचा स्वीकार आपण करू. चला तर या नवरात्राच्या निमित्ताने आरोग्य संवर्धन करूया ‘या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेन संस्थिता नमस्तय्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः’ सर्वांची तृष्णा, क्षुधा, शांत करून दृष्टी प्रदान करणारी भगवती शाकंभरीस कोटी कोटी प्रणाम !
माहिती – प्रविण देशपांडे गुरुजी ( 9011053497 / 7507109119 )
अधिक वाचा –
– इंद्रायणी नदीचे प्रदूषण थांबवा, पुलाला संरक्षक कठडे बसवा; कातवी ग्रामस्थांचे थेट मुख्यमंत्री शिंदेंना निवेदन
– अरेच्चा, असं कसं झालं? वडगाव दुय्यम निबंधक कार्यालयातूनच मूळ दस्त गायब, गुन्हा दाखल