पेरणे फाटा इथे 1 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेला विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांतता आणि उत्साहात साजरा व्हावा, यासाठी आवश्यक सर्व सुविधा प्रशासनातर्फे उपलब्ध करून देण्याची पूर्वतयारी करण्यात आली आहे. सोहळ्याच्या नियोजनासाठी प्रशासन सज्ज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
यावेळी पोलीस सहआयुक्त रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) महासंचालक सुनिल वारे, पीएमपीएलचे महाव्यवस्थापक संजय कोलते, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपविभागीय अधिकारी संजय आसवले, विविध यंत्रणांचे अधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. ( Shaurya Day 1 January Pune Administration ready for Vijaystambha greeting ceremony )
डॉ. देशमुख म्हणाले, दरवर्षी साजरा होणारा विजयस्तंभ अभिवादन सोहळा हा महत्वाचा आणि भावनीक कार्यक्रम आहे. यावर्षी अधिक अनुयायी येण्याचे गृहीत धरून सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून शासनातर्फे समिती गठीत केली आहे. 210 एकरात 33 ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था, पीएमपीएल बसेससाठी 4 ठिकाणी थांब्याची सोय, राखीव वाहनतळ, वीज, आकर्षक रोषणाई, बुक स्टॉल, शुद्ध पाण्याची व्यवस्थेसाठी 150 टँकर्स, फिरते शौचालय, आरोग्य सेवेसाठी 15 पथके, 259 वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, 50 रुग्णवाहिका, 27 जनरेटर सेट, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकासोबत स्वयंसेवक बोटी इत्यादी आवश्यक सुविधा पुरविण्यात येणार आहेत.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 4 हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. 31 डिसेंबर रोजी 475 पीएमपीएल बसेस तर 1 जानेवारी 2024 रोजी 575 पीएमपीएल बसेसचे नियोजन केले आहे. प्रत्येक बसवर दोन कर्मचारी, राखीव चालक, यांची नेमणूक करण्यात आली आहे. पुणे पोलीस विभागाकडून पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक वळविण्याचे आदेश जारी केले आहेत. वाहतूकीतील बदलांविषयी नागरिकांना पूर्वसूचना देण्यात येईल.
सर्व अनुयायांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, म्हणून प्रशासन योग्य ती दक्षता घेत आहे. नियोजन करताना विविध संघटना आणि नागरिकांच्या सूचना लक्षात घेण्यात येतील. आयोजनादरम्यान कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि आनंदाच्या वातावरणात सोहळा साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले.
सोहळा अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करण्यात येईल. सोहळा शांतता, संयम आणि त्याच उंचीने साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही देशमुख यांनी केले. विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सोहळ्याच्या आयोजनाबाबत सूचना केल्या आणि सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणार असल्याचे प्रतिनिधींनी सांगितले.
अधिक वाचा –
– ‘पीएमआरडीए’चे अभियंता अजिंक्य पवार यांची वराळे गावाला भेट; आमदार सुनिल शेळकेंनी केली होती सुचना
– भाजपाकडून पुणे जिल्हा ‘आयुष्मान भारत’ संयोजकपदी सी.ए. योगेश म्हाळसकर यांची नियुक्ती
– तळेगाव दाभाडे येथील सुनिल उकाळे यांची राष्ट्रीय मराठा पार्टीच्या मावळ लोकसभा मतदारसंघ अध्यक्षपदी नियुक्ती