Dainik Maval News : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला आणि मराठी हिंदू नववर्षाचा (चैत्र शुक्ल प्रतिपदा) पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा सण. गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येकजण घराच्या दारात विजयाचे प्रतीक म्हणून बांबूवर रेशमी वस्त्र, कडुलिंब, साखरेच्या गाठी आणि तांब्याचा कलश लावून ‘गुढी’ उभारत असतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आणि त्यांच्या शौर्याचे – विजयाचे प्रतिक असलेले गडकोट हेही सर्वांसाठी तितकेच पुजनीय असून गडकोटांवर देखील अनेक शिवभक्तांकडून गुढीपाडवा साजरा केला जातो.
गुरूवारी (दि.१९) गुढीपाडवा निमित्त मावळ तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले तिकोणा गडावर शिवभक्तांनी अत्यंत उत्साहात गुढीपाडवा सण साजरा केला. पारंपारिक पद्धतीने गडावर गुढी उभारून हिंदू नववर्षाचे स्वागत केले.
“आधी गुढी गडावर नंतर आमच्या दारावर” या उक्तीनुसार, ‘सह्याद्री आणि मी’ आणि ‘श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था’ या संघटनांच्या सदस्यांनी किल्ले तिकोणा गडाच्या मुख्य प्रवेशद्वारावर गुढी उभारली. याप्रसंगी किल्ल्याच्या आवारात असलेल्या अनेक मंदिरांमध्ये पूजा विधी पार पाडले. वितंडेश्वर मंदिर, श्री राम गादी, देवीचे मंदिर आणि चापेटदान मारुती मंदिर सर्वांनी नतमस्तक होऊन दर्शन घेतले.
हा उपक्रम केवळ सणापुरता मर्यादित नव्हता तर गडसंवर्धन आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्याबाबतचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम ठरला. या उपक्रमात दुर्गसेविका तृप्ती कालेकर, भाग्यश्री घरदाळे, प्रणाली रोकडे, गडपाल सुजित मोहोळ, तुषार कालेकर, उन्मेश पोखरकर, मनोज दाभाडे, चिराग घरदाळे, साहिल कालेकर, यश लोहर, अनिकेत शेडगे, वरद कवडे , दत्तात्रय वाडेकर, सुजित शेडगे, मोहित मिटकरी आणि प्रदीप लालगुडे यांनी सहभाग घेतला.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळच्या निसर्गाचा विनाश थांबवा ! स्थानिक पर्यावरणमित्रांचे वीज प्रकल्पाविरोधात प्रशासनाला निवेदन ; तीव्र आंदोलनाचा इशारा
– आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून शिळींब येथे आदिम सेवा अभियान अंतर्गत ९५ आदिवासी नागरिकांना जातीचे दाखले वाटप
– गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाच्या एका चुकीने ज्ञानेश्वरीने गमावला जीव ; सोमाटणे फाटा येथील मन सुन्न करणारी घटना

