पुण्यातील विविध ठिकाणांहून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेली काही तरुण मंडळी भक्तिमय विचारधारणेतून संघटित होऊन आपल्या “श्री देवदर्शन यात्रा समिती, पुणे” च्या वतीने गेली कित्येक वर्षे नियमित “श्री क्षेत्र पंढरपूर दर्शन यात्रा” आयोजित करीत आहेत. याही वर्षी असंख्य वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल रुख्मिणीचे समितीने आपल्या सदस्यांसमवेत मनोभावे दर्शन घेतले. ( shri devdarshan yatra samiti pune Appeal for clean wari 2023 )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
समितीच्या वतीने भक्तिमय वसा जपत दरवर्षी विविध समजोपायोगी उपक्रमही राबविले जातात. यंदाच्या आपल्या दर्शन यात्रेदरम्यान समितीने “श्री तीर्थक्षेत्र स्वच्छता अधिवेशन” या उपक्रमाअंतर्गत श्री क्षेत्र पंढरपूर येथे सर्व भक्तगण वारकरी आणि मंदिर परिसरातील व्यवसायिकांना वारीच्या दरम्यान शक्य तितक्या प्रमाणात स्वच्छता ठेवण्याचे आवाहन केले. जेणेकरून कुठल्याही रोगराईचा प्रसार होणार नाही. वैयक्तिक संभाषणातून आणि स्वच्छतेच्या आवाहनाचे फलक प्रदर्शित करून येणाऱ्या प्रत्येक भाविकास आपल्या हातून मंदिर परिसर अन् वारीचा मार्ग हा स्वच्छ ठेऊ, याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सांगितले.
समिती सदस्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत उपस्थित सर्वांनी स्वच्छतेचे पालन करणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच स्वच्छता आवाहनाचा आशय प्रदर्शित करणारे आकर्षक फलक परिसातील व्यावसियकांनी स्वत:हून मागवून ते आपल्या दुकानांमध्ये सर्व ग्राहकांना दिसतील अशा प्रकारे कायम करून ठेवले. त्याबद्दल त्यांचे समितीच्या वतीने मनापासून आभार मानण्यात आले.
समितीच्या कार्याची इत्तंभूत माहिती घेऊन दरवर्षी नवनवीन अभिनव उपक्रम राबवित नावलौकिक वाढविणार्या सदस्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांचे परिसरातील भक्तगण आणि व्यावसायिकांनी भरभरून कौतुक करून केले. येणाऱ्या काळात असेच संघटित राहून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यास प्रयत्नशील राहण्याचा मानस असल्याचे समितीच्या प्रमुख सदस्यांनी नमूद केले.
अधिक वाचा –
– मावळ तालुका वारकरी मंडळाची महिला कार्यकारिणी जाहीर, अध्यक्षपदी सारिका निकम, पाहा संपूर्ण कार्यकारिणी
– पिंपळोली येथील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न, आमदार सुनिल शेळकेंकडून निधी उपलब्ध