Dainik Maval News : कंपन्यांना आवश्यक त्या कौशल्याधारित मनुष्यबळाची माहिती घेऊन इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या यशोदा महादेव काकडे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्याप्रकारे अभ्यासक्रम राबविले जातील. औद्योगिक क्षेत्रातील वाहतूकव्यवस्था, आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी या कॉलेजमध्ये सर्व कंपन्यांच्या एचआरसोबत बैठक घेऊन नियोजन करणार आहोत. कारण शिक्षण आणि उद्योग हातात हात पुढे जाणे, ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष व उद्योजक रामदास काकडे यांनी केले.
इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या वतीने यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग, इंद्रायणी महाविद्यालय येथे नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तळेगाव, चाकण, कान्हे, उर्से औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या या महोत्सवात सहभागी झाल्या होत्या. या नोकरी महोत्सवात ६५० बेरोजगार मुला-मुलींनी नोंदणी केली. यापैकी ५६२ जणांना तात्काळ नोकरी मिळाली.
या महोत्सवाचे उदघाटन डी.एम.सी.एम.एस. चे कार्यकारी संचालक डॉ. संजय जोपे व तहसीलदार वैशाली वाघमारे यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यवाह चंद्रकांत शेटे, रामदास काकडे बोलत होते. युवा उद्योजक रणजीत काकडे, डॉ. यशवंत वाघमारे, उद्योजक संजय साने, ऍड. अभिजीत आवारे, विशाल लोखंडे, महेश निंबाळकर, विक्रम काकडे, गोरख काकडे, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, प्राचार्य डॉ. संजय आरोटे, यांच्यासह विविध कंपन्याचे एचआर, पोलीस अधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
रामदास काकडे म्हणाले, की तळेगाव औद्योगिक विकास क्षेत्र (एमआयडीसी) निर्माण होताना जवळून पाहिले आहे. यामागे शेतकऱ्यांचा मोठा त्याग आहे. मावळमधील टाकवे, आंबळे अशी आणखी काही गावे समाविष्ट झाल्यास तळेगाव, चाकण, शिक्रापूर, रांजणगाव ही आशिया खंडातील सर्वात मोठी एमआयडीसी ठरणार आहे.
डॉ. संजय जोपे म्हणाले, आज अनेक नोकऱ्या उपलब्ध आहेत. मात्र, अनेक कंपन्यामध्ये कौशल्यधारित मुले मिळत नाहीत. उत्तीर्ण झाल्यावर आपल्यामध्ये विद्यार्थ्यांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत. कौशल्यातले बदल, अडचणीवर मात करीत पुढे गेल्यास नक्कीच यश मिळते. वर्षातून दोन तीन वेळा असे नोकरी मेळावे घेण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.
तहसीलदार वैशाली वाघमारे म्हणाल्या, नोकरी महोत्सवाचा मावळ वासियांना मोठा फायदा होत आहे. असे महोत्सव झाले पाहिजेत. एचआर विशाल पाटील म्हणाले, महाविद्यालयीन जीवन पूर्ण होत असताना करिअरची चिंता भेडसावत असते. अशा नोकरी महोत्सवातून अनेकांच्या हाताला काम मिळाले. रिअल लाईफ हिरोंचा आदर्श घ्या. उद्योजक रामदास काकडे, युवा उद्योजक रणजित काकडे यांचा आदर्श तरुणांनी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे.
एचआर अमृता पाथरे म्हणाल्या, की ध्येय डोळ्यासमोर समोर वाटचाल केल्यास यश निश्चित मिळते. संधी मिळते, स्वतःला सिद्ध करता यायला हवे. आत्मविश्वासाने प्रत्येक गोष्टीला सामोरे जा. एचआर प्रमोद पवार म्हणाले, काम करताना तग धरणे गरजेचे आहे. नोकरीची धरसोड करू नका. अनुभव वाढेल तसा पगार वाढत जाईल.
प्रास्ताविक करताना डॉ. संभाजी मलघे म्हणाले, नामांकित कंपन्याच्या माध्यमातून मोठ्या नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या. अनेक क्षेत्रात रोजगाराची संधी असते. मात्र, माहिती अभावी नोकरी मिळत नाही. अशा संस्था पुढे येत तरुणांपर्यंत संधी पोहोचवत आहेत. सूत्रसंचालन प्रा. आर आर डोके यांनी, तर आभार प्राचार्य डॉ. संजय आरोटे यांनी मानले.
अधिक वाचा –
– 30 मे पर्यंत तळेगाव शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आढावा बैठकीत आमदार सुनील शेळके यांची सूचना । MLA Sunil Shelke
– लोणावळा शहरात उद्धव ठाकरेंच्या पक्षाला खिंडार, अनेक आजी-माजी पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत दाखल । Lonavala News
– मुंबई-पुणे मिसिंग लिंक : कुठलीही तडजोड न करता पुलाचे काम काळजीपूर्वक करण्याचे एकनाथ शिंदे यांचे निर्देश । Mumbai Pune Missing Link
– शिळींब गावात ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा उत्साहात ; कीर्तन सोहळ्याला आमदार सुनील शेळके यांची उपस्थिती । Maval News