Dainik Maval News : महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाकडून वनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धनाचे काम प्रभावीपणे करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना, त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी व उत्कृष्ठ कार्याबद्दल प्रोत्साहित करण्यासाठी राज्यस्तरीय पदक देऊन गौरविले जाते. त्यानुसार नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या पदक प्राप्त अधिकाऱ्यांच्या यादीत मावळ तालुक्यात वन संरक्षण व संवर्धनासाठी काम केलेले तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी सुशील मंतावार यांना रजत पदक जाहीर करण्यात आले आहे.
- २०२१ ते २०२४ या कार्यकाळात मावळ तालुक्यात शिरोता हद्दीत वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत असताना सुशील मंतावार यांनी अत्यंत प्रभावी काम केले होते. वन्यजीवांच्या संरक्षण व संवर्धनासाठी तसेच वन संरक्षण व संवर्धनासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले होते. यात जंगल बंधारे बांधणे, वन्यप्राण्यांसाठी पाणवठे निर्मिती, वणवे रोखण्यासाठी उपाययोजना, वन संपत्ती बचावासाठी जनजागृती मोहीम आदी उपक्रम राबविले होते. सुशील विठ्ठलराव मंतावार यांच्या कार्याची दखल घेत यांना सन २०२०-२१ वर्षांतील वन / वन्यजीव व्यवस्थापन कार्य प्रकारातील रजत पदक जाहीर करण्यात आले आहे.
सुशील मंतावार यांची गतवर्षी शिरोता येथून वाशीम येथे पदोन्नतीने बदली झाली आहे. सध्या ते सहाय्यक वनसंरक्षक म्हणून कार्यरत आहे. तत्पूर्वी त्यांनी मोहरली ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वनपरिक्षेत्र अधिकारी, बीआरटीसी चंद्रपूर येथे वनपरिक्षेत्र अधिकारी व शिरोता मावळ येथे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून काम केले आहे.
वनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धनाचे काम प्रभावीपणे करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासनाकडून प्रतिवर्ष सुवर्ण, रजत पदक बहाल करून गौरविण्यात येते. मुख्य वनसंरक्षकांनी पाठविलेल्या शिफारसींमधून राज्यस्तरीय पदक निवड समिती अधिकारी, कर्मचारी यांची निवड करते. त्यानुसार वन विभागाकडून सन २०२०-२१, सन २०२१-२२ व सन २०२२-२३ या तीन वर्षांत उत्कृष्ठ काम केलेल्या सहा कार्यप्रकारांसाठी राज्यस्तरीय पदक निवडीच्या शिफारसीनुसार एकूण ७६ अधिकारी, कर्मचारी यांना पदके जाहीर केली आहेत. राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने कार्यासन अधिकारी वि. श. जाखलेकर यांनी याबाबतचा शासन निर्णय मंगळवारी (दि.११) प्रसिद्ध केला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूक : छाननीत पाच अर्ज बाद, 195 अर्ज वैध
– मावळात जेई लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्धार ; 1 वर्षे ते 15 वर्षे वयोगटातील बालकांचे केले जाणार लसीकरण । Maval News
– मावळातील पुणे ग्रामीण पोलीस दलाची ‘ती’ चार ठाणी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयास जोडण्यास गृह विभागाचा नकार ? । Maval News