सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेल्या मावळ तालुक्यातील ढाक भैरी या डोंगर गडावर पर्यटनासाठी वर्षभर अनेक ट्रेकर्स येत असतात. हौशी आणि साहसी पर्यटकांसाठी हा परिसर नेहमीच खुणावत असतो. मात्र अनेकदा माहितीच्या अभावी आणि अतिसाहसाच्या नादात पर्यटक या ठिकाणी चुकतात किंवा फसतात. असाच प्रकार मंगळवारी घडला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्युट वडगाव येथे शिक्षण घेत असलेले 4 विद्यार्थी मित्र मंगळवारी ढाक भैरीच्या गडावर ट्रेकिंगसाठी गेले होते. कोंडेश्वर मार्गे धाक भैरीवर त्यांनी चढाई केली. गड चढत असतानाच चौघेही रस्ता चुकले. त्यांना परतीचा मार्ग लक्षात येईना. आपण चुकलोय हे समजताच त्यांनी अनेकांना मदतीसाठी फोन केले. ( Success in rescuing stranded tourists at Dhak Bahiri Maval Taluka )
शेवटी शिवदुर्ग मित्र लोणावळा, आपला मित्र मावळ, वन्यजीव रक्षक मावळ संस्था, कामशेत पोलीस आणि कोंडेश्वर ग्रामस्थ यांनी या मुलांना शोधण्याची मोहीम सुरू केली. मंगळवारी रात्री नऊ वाजता शोध मोहीम सुरू झाली. चार तास अथक शोध घेतल्यानंतर बुधवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास रस्ता चुकलेले चौघे कुसुर पठाराजवळ आढळले.
चेतन कबाडे, सुमीत शेंडे, आमोल मोरे, आदित्य सांगळे अशी सुटका केलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. बचाव पथकातील स्वयंसेवकांनी चारही मुलांना सुखरुप खाली आणले. ढाक भैरी हा सह्याद्री पर्वतरांगेतील चढाई करण्यासाठी अतिशय अवघड असलेला भाग मानला जातो.
शिवदुर्ग मित्र लोणावळाचे सुनिल गायकवाड, महेश म्हसणे, योगेश उंबरे, रतन सिंग, हर्ष तोंडे, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे निलेश गराडे, आपत्ती व्यवस्थापनचे अध्यक्ष गणेश निसाळ, गणेश ढोरे, विनय सावंत, सत्यम सावंत, शुभम काकडे, कमल परदेशी, जीगर सोलंकी, विकी दौंडकर, साहील नायर व पोलीस पाटील यांनी या शोध मोहिमेत सहभाग घेतला.
अधिक वाचा –
– अबब..!! कामशेतमध्ये आढळला तब्बल 8 फूटी अजगर, वन्यजीव रक्षक मावळच्या शिलेदारांकडून जीवदान
– लोणावळा शहराजवळील ‘या’ प्रसिद्ध पर्यटनस्थळी वर्षाविहारासाठी जाण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, थेट 144 (1) केलाय लागू