Dainik Maval News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बुधवारी दुपारी पक्षाच्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर झाली. यात आमदार सुनिल शेळके यांनाच दुसऱ्यांदा मावळची आमदारकी जाहीर कऱण्यात आली. आमदार सुनिल शेळके यांना अधिकृतरित्या राष्ट्रवादीची अर्थात महायुतीची उमेदवारी जाहीर होताच, त्यांच्या समर्थकांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला. तसेच आमदार शेळके हेही वडगाव मावळ ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरात आले, आणि पोटोबा महाराजांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
यावेळी आमदार सुनिल शेळके यांनी माध्यमांशी बोलताना आपली पहिली प्रतिक्रिया दिली. ‘गेल्या पाच वर्षांत आपण मावळच्या जनतेची मनोभावे अहोरात्र सेवा केली. मावळचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळेच मावळची जनता आजही माझ्याबरोबर आहे. त्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मला मावळच्या जनतेची सेवा करण्याची पुन्हा एकदा संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे व पक्षाच्या सर्व नेत्यांचे, त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महायुतीच्या सर्व नेत्यांचे मी आभार मानतो,’ असे आमदार शेळके म्हणाले.
राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आणण्यासाठी मावळ तालुक्यातील महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मिळून एकजुटीने प्रयत्न करणार आहोत. तालुक्यातील सर्व पक्षांचे ज्येष्ठ नेते, इच्छुक उमेदवार, प्रमुख कार्यकर्ते, संघ परिवार तसेच विविध संस्था, संघटनांचे प्रमुख पदाधिकारी या सर्वांना भेटून या निवडणुकीतही सहकार्य करण्याची विनंती करणार आहे, असे शेळके यांनी सांगितले.
महायुतीचा उमेदवार म्हणून उद्या सकाळी (गुरुवार, 24 ऑक्टोबर) वडगाव मावळ येथील तहसीलदार कार्यालयात अर्ज दाखल करणार आहे. त्यावेळी महायुतीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी-कार्यकर्ते, माझ्यावर प्रेम करणाऱ्या मावळातील सर्व माता-भगिनी व बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून मला आशीर्वाद द्यावेत, अशी विनंती आमदार शेळके यांनी केली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात राष्ट्रवादीला मोठा धक्का ! बापूसाहेब भेगडे यांच्याकडून पदाचा राजीनामा
– राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर ! मावळ विधानसभेतून आमदार सुनिल शेळके यांना दुसऱ्यांदा उमेदवारी, पाहा संपूर्ण यादी
– मावळच्या राजकारणात मोठा भूकंप ! बाळा भेगडे यांच्याकडून पदाचा राजीनामा, बाळाभाऊंसोबत भाजपाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे