Dainik Maval News : तळेगाव दाभाडे शहरातील स्टेशन परिसरातील मुख्य वर्दळीचा रस्ता असणारा मार्ग, तळेगाव जनरल हॉस्पिटल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावर रेल्वे स्टेशन बाहेर नो पार्किंग फलक लावण्यात आला आहे. परंतु नागरिकांकडून या सूचनेला केराची टोपली दाखवली जात असून थेट नो पार्किंग फलकाखाली व जवळ वाहने पार्क केलेली दिसत आहे.
मोठ्या प्रमाणात दुचाकी याठिकाणी पार्क केल्या जात आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूकीस अडचणी निर्माण होत आहे. तळेगाव रेल्वे प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी व येण्यासाठी याच मार्गाचा वापर होत असतो. रेल्वे प्लॅटफॉर्मवर जाणाऱ्या प्रवेशद्वारासमोर दुचाकी व चारचाकी वाहने पार्क केली जात असल्याने वाहतुकीस व प्रवशांच्या रहदारीस अडथळ निर्माण होत आहे.
अशा बेकायदा पार्किंग केलेल्या वाहनांमुळे प्रवाशांना व येथून जाणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. १० मीटर अंतरावर अधिकृत पार्किंग स्टॅन्ड असून देखील अनेक नागरिक बिनधास्त पणे नो-पार्किंगच्या फलका जवळच वाहने पार्क करून निघून जातात. या बेशिस्त वाहन लावणाऱ्या नागरिकांमुळे हा रस्ता अरुंद भासत आहे.
सदर रस्त्याने दोन्ही बाजूने जाणाऱ्या वाहनांना अडचणी निर्माण होत आहे. अनाधिकृतपणे पार्क केलेल्या वाहनांवर प्रशासन तसेच वाहतूक पोलीस लक्ष देत नाहीत, ही शोकांतिका आहे. नो पार्किंग क्षेत्राचे फलक नावालाच लावले की काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे. नो पार्किंगच्या क्षेत्रामध्ये वाहने उभी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी शहरातील अनेक नागरिकांनी केली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मुंबई-पुणे दरम्यानचा ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ म्हणजे अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– अत्यंत आनंदाची बातमी! किल्ले लोहगडासह ‘या’ १२ किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश ; शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण
– कौतुकास्पद! टाकवे गावातील रिक्षा चालकाचा मुलगा बनला सनदी लेखापाल (सीए), आई-वडिलांचा आनंद गगनात मावेना