Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 चा निकाल दिनांक 21 डिसेंबर रोजी जाहीर झाला अन् मावळ तालुक्यातील या प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्थेवर नगराध्यक्षपदी भाजपा, तर सर्वाधिक नगरसेवक निवडून आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकणार, हे जवळपास निश्चित झाले. आजी-माजी आमदार असलेल्या या शहराचे राजकारण संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय राहिले. परंतु निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांचे येथील वर्चस्व जवळपास सिद्ध झाले.
स्थानिक राजकारणात भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या युतीतून झालेल्या या निवडणुकीत भाजपाचा नगराध्यक्ष निवडून आल्याने आता निवडून आलेल्या नगरसेवकांमधून कोण उपनगराध्यक्ष होणार, नव्या प्रशासकीय इमारतीत पहिला उपनगराध्यक्ष बनण्याचा मान नक्की कुणाला मिळणार? याची जोरदार चर्चा होत आहे.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाचे दहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे सतरा आणि एक अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. अपक्ष उमेदवार देखील राष्ट्रवादी पुरस्कृत असल्याने एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा युती यांचीच या पालिकेवर सत्ता असणार आहे. दरम्यान नगराध्यक्षपदी भाजपाचे संतोष दाभाडे पाटील हे विजयी झाल्याने उपनगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल, हे जवळपास सर्वश्रूत आहे. अशात राष्ट्रवादीच्या १७ + १ नगरसेवकांत सर्वात प्रबळ दावेदारी कुणाची, याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
मुद्दा क्रमांक एक :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे निवडून आलेले सर्वच उमेदवार हे तुल्यबळ आणि उपनगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. परंतु उपनगराध्यक्ष होण्यापाठी वेगवेगळे विचार पुढे येत आहे. यात प्रामुख्याने पाच वर्षांत पाच उपनगराध्यक्ष करायचे की दहा, हा एक विचार चर्चेत आहे. यातही पाच वर्षांत पाच उपनगराध्यक्ष असावेत, असा ठाम विचार खरेतर राष्ट्रवादीच्या गोटात चर्चेला असल्याची माहिती मिळत आहे. तसेच नगराध्यक्षपदी अडीच वर्षेच प्रथम भाजपाचा नगराध्यक्ष असल्याने पहिल्या टप्प्यात केवळ पहिल्या तीन वर्षांत देता येणारे तीन उपनगराध्यक्ष किंवा पाच उपनगराध्यक्ष यांचा विचार होऊ शकतो.
मुद्दा क्रमांक दोन :
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत राष्ट्रवादीच्या सतरा व एक अपक्ष अशा अठरा नगरसेवकांत एकूण अकरा महिला नगरसेविका आहेत. तर, सात पुरुष नगरसेवक आहेत. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत पहिल्या टप्प्यात भाजपाचा पुरुष नगरसेवक असल्याने आणि आमदार सुनील शेळके यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा पुरुष नगरसेवक होणार असल्याने पहिल्या टप्प्यात महिला उपनगराध्यक्ष होण्याची शक्यता अधिक आहे. या होऱ्याने पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादीच्या गोटातील एकूण अकरा महिला नगरसेवकांपैकी एकीची उपनगराध्यक्षपदी वर्णी लागू शकते.
मुद्दा क्रमांक तीन :
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या एकूण सात पुरुष नगरसेवकांमध्ये अनेकजण हे थेट नगराध्यक्षपदासाठी इच्छुक होते. परंतु नगराध्यक्षपदी भाजपा उमेदवाराची वर्णी लागल्याने पहिल्या टप्प्यात पुरुष नगरसेवकाला उपनगराध्यक्षपदाची संधी देण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाकारता येणार नाही, तसे शब्दही काही नगरसेवकांना दिले असल्याची चर्चा दबक्या आवाजात होत आहे.
मुद्दा क्रमांक चार :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व नगरसेवकांपैकी काहीजण हे अनुभवी आहेत, तर काहीजण नवखे असले तरीही समाजकार्यात नेहमी अग्रेसर आहेत. त्यामुळे अनेक मातब्बर नगरसेवक हे उपनगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत. तरीही अठरा नगरसेवकांपैकी उपनगराध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या नगरसेवकांमध्ये महिलांपैकी भारती सुरेश धोत्रे, शैलजा कैलास काळोखे, हेमलता चंद्रभान खळदे, संगिता सतीश खळदे, कमल नामदेव टकले, डॉ. ऋतुजा विजय काळोखे (अपक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत नगरसेविका) आणि पुरुषांपैकी संदीप बाळासाहेब शेळके, गणेश मोहनराव काकडे, संतोष मारुती भेगडे, सुदाम शंकरराव शेळके, सत्यम गणेश खांडगे यांची नावे सर्वाधिक चर्चेत आहेत. परंतु धक्कातंत्र अवलंबून पक्षश्रेष्टी कोणत्याही नगरसेवकाच्या गळ्यात उपनगराध्यक्षपदाची माळ टाकू शकतात, हेही लक्षात घ्यायला हवे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मंगरूळ अवैध उत्खनन प्रकरण : निलंबित महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द, दहाही अधिकाऱ्यांना मोठा दिलासा
– तळेगावमधील सर्व सोसायट्यांना 31 डिसेंबरपर्यंत नळजोडणीस वॉटर मीटर बसविण्याची सक्ती ; वॉटर मीटरला विरोध केल्यास नळजोड खंडीत होणार
– श्री लोहगड ते श्री भिवगड : मावळ तालुक्यात तब्बल 23 वर्षांनंतर धारातीर्थ गडकोट मोहीम – जाणून घ्या मोहिमेबद्दल
– धक्कादायक ! खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीला संपवलं ; रस्त्यात गाडी अडवून केला प्राणघातक हल्ला

