जगात अनेक प्रकारच्या संस्कृती आहेत. असे असले तरी प्रत्येकात एक समान धागा आहे तो म्हणजे उत्सवप्रियता. मानवी स्वभाव हा उत्सव प्रिय आहे. आपल्या दैनंदिन जीवनात एक वेगळे चैतन्य यावे, या हेतूने विशिष्ट दिवस हे विशिष्ट कारणांसाठी आपण साजरे करत असतो. जगामध्ये अनेक देशात वेगवगेळया तारखांना शिक्षकदिन साजरा करण्याची पध्दत आहे. परंतू, दिनांक 5 ऑक्टोबर हा जागतिक शिक्षकदिन आहे.
दिनांक 5 ऑक्टोबर 1966 रोजी स्वाक्षरी केलेल्या “शिक्षण स्वातंत्र्य” कराराच्या स्मरणार्थ हा दिवस जागतिक शिक्षकदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय करण्यात आला आहे. जगातील जवळपास सर्वच देशात तो साजरा केला जातो. जगामध्ये विविध कायदे निर्माण झाले त्यातून त्या क्षेत्रातील कार्याविषयी जागृती निर्माण होऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे. विचारांचे आदानप्रदान व्हावे या उदात्त हेतूने प्रत्येक क्षेत्रासाठी स्वतंत्र दिवस नेमुन तो साजरा केला जातो.
दिनांक 5 ऑक्टोबर हा जागतिक शिक्षकदिन आहे. असे असले तरी अनेक देशांत या आंतरराष्ट्रीय शिक्षक दिवसांपेक्षा स्वतंत्र शिक्षक दिन वेगवेगळ्या तारखांना साजरा केला जातो. शिक्षण क्षेत्रातील अतिविशिष्ट्य कार्यासाठी विशेष योगदानाबद्दल किंवा शिक्षणातील समुदायाच्या कार्यासाठी त्यांना सन्मानित करण्यासाठी उत्सवांचा स्वरुपात त्यांना मानवंदना देण्यासाठी व त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या भरीव कार्याचे स्मरण पुढील पिढ्यांना व्हावे हा त्या मागील हेतू आहे.
उदाहरणार्थ, अर्जेंटिनाने 11 सप्टेंबर रोजी डॉमिंगो फॉस्टिनो सर्मिएन्टोच्या मृत्यूचे स्मरण म्हणून शिक्षक दिन म्हणून केले आहे. भारतात दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस, 5 सप्टेंबर हा 1962 पासून शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. तर गुरु पौर्णिमा हा दिवस गेली हजारो वर्ष व्यासपौर्णिमेला साजरा केला जातो. गुरु आणि शिक्षक यात फरक आहे त्यामुळे हिंदू आपल्या गुरुंची पूजा करण्याचासाठी गुरुपौर्णिमा पारंपारिकपणे साजरा करतात. ( Teachers Day World Teachers Day and Guru Purnima Read Information in Marathi )
भारतात शिक्षकदिन साजरा करण्याचे कारण :
जेव्हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे राष्ट्रपती झाले, तेव्हा त्यांच्या काही विद्यार्थी आणि मित्रांनी त्यांना 5 सप्टेंबर रोजी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची परवानगी देण्याची विनंती केली. त्याने उत्तर दिले की, “माझा वाढदिवस साजरा करण्याऐवजी, 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून पाळला गेला तर मला अभिमान वाटेल”. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा शिक्षण क्षेत्रातील कार्याविषयी काही लोकांना विशेष माहिती नसल्याने शिक्षकदिनासाठी त्यांचे नाव पुसण्याचा प्रयत्न हल्ली केला जाताना दिसत आहे.
शिक्षकदिनांचे खरे अधिकारी म्हणून वेगवेगळया महापुरुषांची नावे मेजेस तयार केले जात आहेत. शिक्षकदिनाच्या निमित्ताने ते सर्वत्र प्रसारीत केले जात आहेत. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी भारतात आणि भारताबाहेरही शिक्षक म्हणून एकुणच शिक्षणक्षेत्रात जे कार्य केले आहे, त्याची माहिती आपण या निमित्ताने घेतली पाहिजे. डॉ राधाकृष्णन हे भारताचे व्दितीय राष्ट्रपती असून 1954 मध्ये डॉ. राधाकृष्णन यांना शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी “भारतरत्न” हा भारतातील सर्वोच्च सन्मान देण्यात आला आहे.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्ये :
- शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीस सहाय्यक प्राध्यापक आणि नंतर प्राध्यापक म्हणून अनुक्रमे मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेज आणि म्हैसूर विद्यापीठामध्ये 1918 – 1921 दरम्यान काम केले.
- म्हैसूर विद्यापीठाने राधाकृष्णन यांचा तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून गौरव केला होता.
- 1921 – 1931 या दरम्यान कोलकत्ता विद्यापीठाने त्यांना तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नियुक्त केले.
- राधाकृष्णन 1931 – 1936 मध्ये आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू झाले.
- 1939 मध्ये पंडित मदन मोहन मालविययांच्या विनंतीवरून त्यांनी बनारस विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सूत्र हाती घेतले. ते 1948 पर्यंत बनारस विद्यापीठाचे कुलगुरू राहिले.
- कोलकत्ता विद्यापीठ आणि बनारस विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठात काम पाहत असताना डॉ. राधाकृष्णन यांनी प्राध्यापक पदाचा त्याग केला नाही.
- कोलकत्ता विद्यापीठातील आठवडाभराचे अध्यापनाचे दिवस सांभाळून शनिवार आणि रविवार हे दोन दिवस ते बनारस विद्यापीठाचेही प्रशासकीय कारभार पाहत असत.
- ऑक्सफर्ड विद्यापीठात दरवर्षातून काही महिने अशाप्रकारे 20 वर्षे त्यांनी अध्यापनाचे कार्य केले.
- राधाकृष्णन यांच्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात (1936 – 1952) विद्यासन निर्माण केले होते. जागतिक ऑक्सफर्ड विद्यापीठात त्या काळी भारतातील कोणासाठी विद्यासन तयार होणे हा भारतीयांसाठी एक गौरव आहे.
भारताच्या उभारणीमध्ये, प्रगती मध्ये अनेकानेक महापुरुषांचे योगदान आहे. धर्म, जात, भाषा, प्रांतवाद , पक्षीय विचारधारा याच्या पलीकडे जावुन प्रत्येक व्यक्तीने देशासाठी केलेल्या त्यागाची आपण आठवण ठेवली पाहिजे. स्वत:ला फक्त विशिष्ट विचारसरणी मान्य आहे, त्या मुळे इतरांनी वेगवेगळया क्षेत्रात केलेल्या त्यागाचा व त्यांच्या कार्याचे श्रेय न देणे हा संकुचित वाद आपण स्वीकारता कामा नये. वेगवेगळया काळखंडात वेगवेगळया महापुरुषांनी आपल्या व्यक्तीगत सुखाचा, प्रसंगी सर्वस्वाचा त्याग करुन या देशासाठी बलिदान दिले आहे. अश्या प्रत्येक महापुरुषांच्या कार्यासाठी राष्ट्र सदैव विनम्र होत राहिल.
100 पेक्षा जास्त देश जागतिक शिक्षक दिन 5 ऑक्टोबरला साजरा करतात. भारतातही तो साजरा केला जातो, पण 5 सप्टेबर हा विशेष दिवस डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे भारतीय शिक्षण क्षेत्रातील कार्य व त्यांचे तत्वज्ञान आपणांस सतत स्मरण करित राहील यात शंका नाही. भारतात गुरुपौर्णिमा साजरी होते म्हणून कोणी जागतिक शिक्षक दिन वा भारतीय शिक्षक दिन साजरा करण्याचे बंद करीत नाही. “शिक्षक हा कधीच सामान्य नसतो; त्याच्या हाती निर्माण आणि विनाश या दोन्ही गोष्टी असतात.” शिक्षकाचा असाधारण गुण चाणक्याच्या या शब्दांतून दिसून येतो. भारतीय संस्कृती आणि मुल्यांच्या जतनासाठी अशा असामान्य वैशिष्ट्यांच्या शिक्षकांना समाजाचे नेतृत्व करावे लागेल. त्यासाठी शिक्षक दिनाचे महत्व आहे.
लेखन – अजित देशपांडे (संतविचार अध्यासन)
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– कामशेत शहर महिला आघाडी अध्यक्षपदी ‘यांची’ निवड, इंदोरी इथे कलश पूजन आणि पंचप्राण शपथ कार्यक्रम
– पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांसमोर काढला राष्ट्रवादीच्या काळातील ‘मावळ गोळीबार’चा मुद्दा आणि…
– ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा मार्ग मोकळा, राज्यभरातील विद्यार्थ्यांना दिलासा; खासदार बारणेंचा पाठपुरावा यशस्वी