जालन्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्याच्या राजकारणाचा केंद्रस्थानी आला आहे. सध्या राज्यात तीन पक्षाचे सरकार असून राष्ट्रवादी काँग्रेस नुकताच सरकारमध्ये सामील झाला आहे. मात्र ह्या सरकारमध्ये वाद-प्रतिवाद करताना भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. सोमवारी (दिनांक 4 सप्टेंबर) पत्रकार पकरिषदेत हे पुन्हा एकदा दिसून आलं.
देवेंद्र फडणवीस टीका करताना अनेकदा राष्ट्रवादीच्या कामाचा उल्लेख करतात. सोमवारी मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना असंच घडलं. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जबाबत स्पष्टकरण देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाठीचार्ज करण्याचा आदेश मंत्र्यालयातून गेला नसल्याचं स्पष्ट केलं. तसेच यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर आणि नंतर अजित पवार यांच्या तत्कालीन सरकारवर निशाणा साधला. ( devendra fadnavis raised issue of maval firing case in the presence of ajit pawar )
काय म्हणाले फडणवीस?
“जालना येथील घटना अतिशय दुर्दैवी आहे. बळाचा वापर केल्याच्या घटनेचे समर्थन होऊच शकत नाही. मी मुख्यमंत्री असताना 2000 आंदोलने झाली, तेव्हाही बळाचा वापर कधीच झाला नाही. आता झालेल्या घटनेसंदर्भात शासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. लाठीचार्जचे आदेश हे कधीच मंत्रालयातून जात नाहीत, ते एसपी स्तरावर होत असतात, पण आता घाणेरडे राजकारण केले जात आहे.” तसेच, “मग गोवारी किंवा मावळ येथील घटनेत आदेश मंत्रालयातून देण्यात आले होते का?” असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर पत्रकार परिषदेत केला.
“ज्यावेळी निष्पाप 113 गोवारी पोलिसांच्या हल्ल्यात मारले गेले, तेव्हा तो आदेश कोणी दिला होता का? तो आदेश मंत्रालयातून गेला होता का?” असे प्रश्न उपस्थित करत फडणवीसांनी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना टोला लागवला. तर, “मावळ येथे शेतकऱ्यांवर गोळीबार झाला, त्यावेळी आदेश कोणी दिले होते का? तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. मात्र गोळीबारावरून त्यावेळी सर्वाधिक टीका अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरच झाली होती.” असे फडणवीस म्हणाले.
मावळ गोळीबार प्रकरण –
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला पवना धरणातून बंद पाइपलाइनमधून पाणी नेण्यास मावळमधील 72 गावांतील शेतकऱ्यांचा विरोध होता. मात्र सदर योजना राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हट्टाने पुढे रेटली जातेय, असा आरोप त्यावेळी आंदोलकांनी केला. या बंद पाईप लाईनच्या विरोधात दिनांक 9 ऑगस्ट 2011 रोजी मोठे जनआंदोलन झाले. बंदिस्त पाईपलाईनला विरोध करण्यासाठी भाजप, शिवसेना, रिपाई आणि भारतीय किसान सभेने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोर्चा काढला होता. या मोर्चाला हिंसक वळण लागले, ज्यात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मावळमधील 3 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. तर 14 जण जखमी झाले होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मराठा समाजाचा निर्णय घेता येत नसेल तर सत्तेत तरी कशाला बसता?
– ‘पवना धरणातील पाणी पाहिजे पण पवना नदी नको, असं का?’, पवनमावळची जीवनदायिनी पुढे बनतेय मैलावाहिनी
– गोरक्षणात प्राण गमावलेल्या गोरक्षकांच्या कुटुंबांना प्रत्येकी 1 लाख; औंध इथे महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या कार्यालयाचे उद्घाटन