Dainik Maval News : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकशाही मूल्यांना बळकटी मिळावी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे मांडल्या जाव्यात या उद्देशाने वडगाव नगरपंचायत कार्यालयात विरोधी पक्षासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी आणि प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेत्या अर्चना म्हाळसकर यांनी दिली.

या उपक्रमाच्या प्रारंभी भाजपचे गटनेते दिनेश ढोरे, पक्षप्रतोद अनंता कुडे, नगरसेवक विशाल वहिले, नगरसेविका सारिका चव्हाण, राणी म्हाळसकर, रोहित धडवले आणि संदीप म्हाळसकर उपस्थित होते. विरोधी पक्ष कक्षाच्या माध्यमातून नगरपंचायतीतील विकासकामांवर सातत्याने लक्ष ठेवले जाणार असून, कामकाजातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी भूमिका बजावली जाणार आहे.
पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य सेवा तसेच इतर नागरी सुविधांशी संबंधित नागरिकांच्या मूलभूत समस्यांचा पाठपुरावा प्रशासनाकडे नियमितपणे करण्यात येणार आहे. नगरपंचायतीच्या निर्णय प्रक्रियेत अधिक पारदर्शकता यावी, जनहिताच्या विरोधातील कोणतेही निर्णय होऊ नयेत आणि विकासकामांची योग्य अंमलबजावणी व्हावी यासाठी हा कक्ष सक्रियपणे कार्य करणार असल्याचे अर्चना म्हाळसकर यांनी सांगितले.
विरोधी पक्षाचे नगरसेवक दर सोमवार, गुरुवार आणि शुक्रवार या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत या कक्षात उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी आपल्या समस्या व तक्रारी कक्षातील तक्रार नोंदवहीत नोंदवाव्यात, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. या उपक्रमामुळे नागरिकांना त्यांच्या प्रश्नांसाठी एक स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम
– खासदार श्रीरंग बारणे : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती
– आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान
– तळेगाव दाभाडे येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल



