Dainik Maval News : शनिवार, दिनांक 19 ऑक्टोबर 2024 रोजी, सायंकाळी अंदाजे 3:40 वाजता पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवरील कामशेत 1 बोगद्याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात टाटा टेम्पो (MH 04 LE 1607) उलटून एकाचा मृत्यू झाला असून, अन्य काही जण गंभीर जखमी झाले आहेत.
फिर्यादी राहुल इंद्रजितसहा (वय 21 वर्षे), राहणार ठाणे, यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते व त्यांचे इतर सहकारी ठाणे येथून सासवड येथे फळे खरेदी करण्यासाठी निघाले होते. वाहनाचे चालक हरेंद्र कुमार हे गाडी भरधाव वेगात चालवत असताना कामशेत बोगद्याच्या बाहेर वाहनाचा ताबा सुटला आणि गाडी पलटी झाली. ( Tempo accident near Kamshet tunnel on Mumbai Pune Expressway one dead )
या अपघातात दुखी भोटन सहा (वय 37) यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य प्रवासी तपेश्वर कुमार आणि मनेजर सहा गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर सर्व जखमींना तात्काळ अॅम्ब्युलन्सने पवना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी दुखी भोटन सहा यांना मृत घोषित केले. इतर जखमींवर उपचार सुरू आहेत.
चालक हरेंद्र कुमार यांच्याविरुद्ध वाहतुकीचे नियम तोडून निष्काळजीपणे वाहन चालविल्यामुळे अपघात केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कामशेत पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.
कामशेत पोलीस ठाण्याच्या वतीने सर्व वाहनचालकांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी वाहतुकीचे नियम पाळून जबाबदारीने वाहन चालवावे, जेणेकरून अशा दुर्दैवी घटनांना आळा बसेल.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शिरोता वनपरिक्षेत्र अधिकारी पदी सोमनाथ ताकवले यांची नियुक्ती, एस.डी. वरक यांच्याकडून स्वीकारला कार्यभार
– रेल्वेत हरवलेली बॅग पुन्हा हाती आली आणि तीचे दुःख हरवले ! रेल्वे पोलीस अनिता रायबोले यांना सॅल्यूट
– ब्राम्हणोली येथील शेतकऱ्यांचा विषमुक्त शेती प्रशिक्षण शिबिरात सहभाग । Maval News