Dainik Maval News : तळेगाव-चाकण रस्त्यावर लोखंडी साहित्याने भरलेल्या ट्रेलरने पिकअप टेम्पोला ठोकरून उलट्या दिशेला फरफटत नेल्यामुळे रविवारी (दि. ७ सप्टेंबर) रात्री सव्वाबाराच्या सुमारास झालेल्या चार वाहनांच्या विचित्र अपघातात पिकअप टेम्पोत बसलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला. तर अन्य पाच जण जखमी झाले. जखमींमध्ये एका दाम्पत्यासह त्यांच्या पाच वर्षीय बालकाचा समावेश आहे.
पिकअप टेम्पोमध्ये बसलेल्या शालुबाई विष्णु गुंड (६७, रा. कामोठे, पनवेल, नवी मुंबई / मूळ गाव – वडगाव दर्या, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. तर, शितल रंगनाथ आहेर (३४, कामोठे, पनवेल, नवी मुंबई), शिवांश रंगनाथ आहेर (०५, कामोठे, पनवेल, नवी मुंबई), रंगनाथ आहेर (३६, कामोठे, पनवेल, नवी मुंबई), स्वप्निल गुंड (३४, कामोठे, पनवेल, नवी मुंबई), संदेश हरिशचंद्र ढेरे (१९, कामोठे, पनवेल, नवी मुंबई) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. जखमींवर तळेगाव दाभाडे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव-चाकण महामार्गावरील माळवाडी (ता. मावळ) येथील श्री लिला हॉटेलसमोर चाकणच्या दिशेने लोखंडी साहित्य घेऊन जाणाऱ्या भरधाव अवजड वाहन ट्रेलरने आळेफाटा येथून मुंबईकडे चाललेल्या पिकअप टेम्पोला ठोकरुन मागे फरफटत नेले. त्यामुळे मागून येणाऱ्या ट्रेलरची टेम्पोला धडक बसली. त्यापाठोपाठ आणखी एक ट्रक या अपघातग्रस्थ वाहनांना येऊन धडकला. चार वाहनांच्या या विचित्र अपघातात महिलेचा मृत्यू झाला.
अपघातानंतर ट्रेलरवरील लोखंडी साहित्य खाली रस्त्यावर पडून विखुरले होते. तसेच अपघातानंतर ट्रेलरचालक न थांबता वाहनासह चाकण दिशेला निघून गेला. अपघातामुळे तळेगाव-चाकण महामार्गावर बराच काळ दुतर्फा वाहतूक कोंडी झाली होती. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला सारुन वाहतूक सुरळीत करण्यात आली.
तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस वाहनासह फरार चालकाचा शोध घेत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील एक केंद्रप्रमुख व दोन शिक्षकांना जिल्हा परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर । Maval News
– प्रशांत दादा भागवत आयोजित गौरी-गणपती सजावट स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न । Prashant Bhagwat
– व्हिडिओ : ग्रामसभेतच अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न ; मावळमधील कामशेत येथील गंभीर घटना । Kamshet News
