Dainik Maval News : मावळ तालुक्यात महायुती होणार नाही, हे विविध मुद्द्यांच्या आधारे दैनिक मावळ टीमने यापूर्वीच सांगितले होते. त्यानंतर मावळमध्ये अनेक घडामोडी घडल्या, ज्यातून महायुती होईल, अशी अपेक्षा व्यक्ती केली जात होती. परंतु अखेर दैनिक मावळच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे. मावळ तालुक्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती होणार नाही, हे जवळपास निश्चित झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर आता भारतीय जनता पक्षानेही आपला पहिला उमेदवार जाहीर केला आहे, यामुळे युतीची चर्चा आता बंद करण्यास हरकत नाही, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
मावळ तालुक्यात विद्यमान आमदार सुनील शेळके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. सलग दोन टर्म आमदार सुनील शेळके हे विक्रमी मताधिक्याने निवडून आलेत, त्यामुळे तालुक्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी ताकद बनली आहे. दुसरीकडे पंचवीस ते तीस वर्षे तालुक्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका यांच्यावर सत्ता राहिलेला आणि संघाचा बालेकिल्ला असलेला भाजपा पक्षाचीही तालुक्यात मोठी ताकद आहे.
दरम्यान गतवर्षीच्या लोकसभा निवडणुकीत तालुक्यात महायुती अस्तित्वात होती, मात्र विधानसभा निवडणुकीत ती दिसून आली नाही. नवीन मावळ पॅटर्न उदयास आला अन् आता तर मावळात थेट भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात राजकीय द्वंद असल्याने महायुती होणार नाही, हे जवळपास निश्चित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला पंचायत समितीचा पहिला उमेदवार जाहीर केल्यानंतर भाजपानेही पंचायत समितीसाठी पहिला उमेदवार जाहीर केला आहे. यातून युतीच्या चर्चाही थंडावल्या आहेत.
चांदखेड गणातील उमेदवार रिंगणात :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चांदखेड पंचायत समिती गणात सुनिता मनोज येवले यांच्या रुपाने आपला पहिला उमेदवार जाहीर केला. तर भारतीय जनता पक्षानेही चांदखडे गणातून आपला पहिला उमेदवार जाहीर केला आहे. भाजपाने चांदखेड पंचायत समिती गणातून सुवर्णा बाळासाहेब घोटकुले यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.
दोन्ही पक्षांकडून सभापती पदाचे चेहरे जाहीर?
मावळ पंचायत समितीचे एकूण दहा गण आहेत. यात यंदाचे पंचायत समितीचे सभापती पद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री करिता आरक्षित आहे. तसेच चांदखेड गण हा नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रि करिता आरक्षित आहे. त्यामुळे पंचायत समितीचा पहिला उमेदवार जाहीर करण्यासोबत आमदार सुनील शेळके आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी अनुक्रमे राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाचे सभापती पदाचे चेहरे जाहीर केल्याचे बोलले जात आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर शक्य नाही ; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
– मावळातील नुकसानग्रस्त भातउत्पादक शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या ; महाविकासआघाडीचे तहसीलदारांना निवेदन
– लाडक्या बहिणींनो… 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा…
– अवकाळीचा फेरा, भिजला भाताचा पेरा ! मावळातील नुकसानग्रस्त भात उत्पादकांना भरपाई देण्याची NCP ची मागणी


