Dainik Maval News : दारू पिऊन आपल्या आई वडिलांना त्रास देतो, या कारणावरून एका महिलेने आपल्या मावस भावांना सोबत घेऊन एका तरुणाचा खून करून पुरावा नष्ट केला. मावळ तालुक्यातील नानोली येथे २६ ऑक्टोबर रोजी घडलेल्या या खून प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
सोमनाथ रघुनाथ काळे (वय ३६, रा. नानोली, ता. मावळ, जि.पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक शाम तुकाराम मस्के (वय ४५) यांनी गुरुवारी (दि. १४) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ब्राम्हणवाडी, ता. मावळ, जि.पुणे येथे राहणार्या एका ४० वर्षीय महिलेसह तिचे मावसभाऊ मंगेश गोविंद दाभाडे (वय ३६) आणि तनेष साईनाथ दाभाडे (वय १९, दोघही रा. कोटेश्वरवाडी, ता. मावळ, जि.पुणे) यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सोमनाथ हा दारु पिऊन येवून आपल्या आई वडिलांना त्रास देतो या कारणाने महिला आरोपी हिने चिडून सोमनाथ याचा खून करण्यासाठी आपला मावस आरोपी मंगेश आणि तनेष यांना दि. २६ ऑक्टोबर रोजी नानोली येथे मयताचे रहाते घरी बोलावून आपसांत संगणमत करुन सोमनाथ याच्या खुनाचा कट रचला.
सोमनाथ दारुच्या नशेत असल्याचा गैरफायदा घेवून त्यांचा पायाने गळा दाबून खून केला. तसेच सोमनाथ हा दारुचे नशेत मयत झाला असल्याचा बनाव करुन मयताचे प्रेताची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट केला. तळेगाव एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सुनीलअण्णा तू एकटा नाही, मावळातील समस्त मातृशक्ती सदैव तुझ्या पाठीशी – रुपाली चाकणकर
– मावळात धक्कादायक प्रकार ; अपक्ष उमेदवाराच्या समर्थकांनी महिला पत्रकाराला धमकावले, चार जणांविरोधात गुन्हा दाखल
– मतदारांनो… मतदान कार्डासह मतदानासाठी ‘हे’ 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावा म्हणून वापरता येणार – पाहा यादी