आपले आणि चंद्राचे नाते आगदी जन्मत:च निर्माण झालेले आहे. अंगाई गीतामध्ये आपल्याला पहिल्यांदा चंद्रासोबत जोडले गेले. त्यानंतर “चांदोमामा” म्हणून प्रत्येकाला एक हक्काचा “मामा” आकाशात दिसू लागला. आकाशात लाखो तारे आहेत पण चंद्र हा आपल्या आयुष्यात प्रत्येक ठिकाणी उपस्थित असतो. जन्मापासून श्राध्दापर्यत चंद्र आणि त्याचे चंद्रबळ आपले आयुष्यातील प्रत्येक निर्णय घेण्यास “मुहुर्त” मदत करीत असतात.
“चन्द्रमा मनसो जातश्च—-” या ऋग्वेदातील पुरुषसुक्तातील वर्णनाप्रमाणे चंद्र हा मनाचा कारक आहे. म्हणजे मन आणि चंद्र यांचा संबंध आहे. फक्त या सुक्तात आहे म्हणून नाही तर आपण त्याचे प्रत्यक्ष प्रमाण पाहू शकतो. अमावस्या आणि पौर्णिमेला समुद्रात भरती आणि ओहोटी येते. याचा अर्थ जेव्हा चंद्राचे बळ आकाशात असते किंवा नसते तेव्हा त्याचा प्रभाव पाण्यावर होतो व त्यातून जे तरंग पाण्यात तयार होतात ते भरती आणि ओहोटी च्या स्वरुपात दिसून येतात.
मानवी शरीरात 70 टक्के पाणी असते असे विज्ञान सांगते. ब्रहृमांडी ते पिंडी म्हणजे आपले शरीर हे ब्रहृमांडाचे छोटे रुप आहे त्या मुळे अवकाशातील खगोलस्थितीचा ब्रहृमांडावर जो प्रभाव पडतो, तोच प्रभाव सुध्दा आपल्या शरीरात त्या प्रमाणात होत असतो. शरीराचे संचलन हे मन करीत असते. शरीरावर परिणाम म्हणजे मनावर पहिल्यांदा परिणाम हा नियम आहे.
मानवी शरीराचे अनेक प्रकार आहेत. आपले शरीर हे स्थुल शरीर असे संबोधले जाते. त्याच्या आत मध्ये सुक्ष्म शरीर असते. चंद्राचा जो परिणाम होतो तो स्थुल शरीरावर दिसत नाही कारण त्याचा प्रभाव / परिणाम हा सुक्ष्म शरीरावर होत असतो. त्या शरीराचे संचालन हे मना व्दारे होत असते. म्हणून जरी स्थुल शरीर झोपलेले असले तरी आपणांस झोपत स्वप्न पडत असतात. त्यात आपण जगात कोठेही संचार करत असतो. तो देह हा सुक्ष्मदेह असतो. संत महात्मे यांना त्यांच्या तपाव्दारे अशी सिध्दी प्राप्त असते कि ते स्थुलदेह आणि सुक्ष्मदेह काही काळासाठी वेगळे करुन जगात कोठेही संचार करु शकतात.
थोडक्यात चंद्राचा मानवी मनावर आणि शरीरावर परिणाम होतच असतो. त्यामुळे चंद्रांच्या कला स्थिती आणि अवस्था याला मानवी , वनस्पती, प्राणी जीवनात महत्वाचे स्थान आहे. चंद्राचे दुसरे नाव सोम असेही आहे. सोमरस हा आयुर्वेदात वर्णन केला आहे. कारण चंद्राव्दारे जी उर्जा मिळते त्यातुन वनस्पतींमध्ये औषधीगुणधर्म तयार होतात. ( Tradition and Importance of Drinking Milk On Kojagiri Purnima Ashwin Purnima Lakshmi Jayanti )
आश्विन पौर्णिमा –
आश्विन महिना हा शरद ऋतुमध्ये येतो म्हणून यास शरद पौर्णिमा असेही म्हंटले जाते. त्या मुळे नवरात्रास सुध्दा शारदीय नवरात्र असे म्हणतात. शारदा देवी चा उत्सवही याच महिन्यात केला जातो. शरद ऋतुचे वैशिष्टय असे आहे की सूर्य हा पृथ्वीपासुन थोडा दूर जातो आणि चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो. त्यामुळे येथून दिवस लहान आणि रात्र मोठी होते. त्यामुळे चंद्राचे महत्व जास्त असते.
- मानवास चंद्रबळाची आवश्यकता असते. वर्षामध्ये 12 पौर्णिमा येतात. पण अश्विन पौर्णिमेला चंद्र हा सर्वात जवळ असल्याने तो नेहमीपेक्षा मोठा दिसतो. या पौर्णिमेस समुद्रात मोती तयार होतात असे मानले जाते. आजच्या दिवशी मानवी आरोग्याच्या दृष्टीने ही पौर्णिमा आकाशातुन जणू अमृत पृथ्वीवर शिंपडत असते. त्यामुळे कोजागीरी पौर्णिमेस दूधाचे महत्व तयार केले आहे.
रात्री चंद्रप्रकाशात दूध ठेवुन त्यात पूर्ण चंद्राचे किरण साठवावीत आणि ते आरोग्यपूर्ण दूध पिणे हा उत्सव सुरु करण्यात आला. आजच्या दिवशी लक्ष्मी ही समुद्रमंधनातून प्रगट झाली असे मानण्यात येते एका अर्थाने आज लक्ष्मी जयंती आहे. देशातील काही भागात या दिवशी “कुमार” म्हणजे “कार्तिकेय” पूजन केले जाते.
“कोजागरी” या शब्दासाठी “को जागर ती” म्हणजे कोण कोण जागे आहे असे प्रत्यक्ष लक्मी्द विचारते आणि जे जागे आहेत त्यांच्या कडे जाते असे सांगितले जाते. आरोग्य हीच लक्ष्मी असल्याने प्रत्यक्ष लक्ष्मी या दिवशी आकाशतुन पृथ्वीवर येते त्यामुळे तिची उपासना या दिवशी सांगितली आहे, कुबेर पूजन मध्यरात्री करावे . काही ठिकाणी इंद्राची पूजा केली जाते. या दिवसाचे महत्व खगोलशास्त्रीय, आयुर्वेदिय, धार्मिक आणि सांस्कृतीक आहे. आजच्या दिवशी बौध्दपरंपरतील वर्षावास हा कालावधी संपतो. भारतभर हा सण वेगवेगळया परंपरेतुन साजरा होतो.
वंशवेल वाढण्याच्या दृष्टीने संततीचे महत्व असते त्या मुळे आश्विन महिन्याच्या पौर्णिमेला “आश्विनी” हे व्रत केले जाते. यात घरातील मोठया संततीला औक्षण केले जाते. प्रत्येक महिलेच्या माहेरचा म्हणजे भावाचा सण असलयाने महिला मोठया भक्तिभावाने आपल्या भावाकडे आरोग्य, ऐश्वर्य आणि समृध्दी मागत असतात, चांदोमामा ही आपल्या बहिणीला तिच्या कुटुंबासाठी हे भरभरुन देत असतो.
त्यामुळे; चांदोबा चांदोबा भागलास का लिबोणीच्या झाडामागे लपलास का? असे म्हणण्यापेक्षा आजचा उत्सव आपल्या जवळ आलेलया चंद्राचे आपण स्वागत घरात बसण्यापेक्षा चंद्रप्रकाशात फिरुन हा साजरा केला पाहिजे.
लेखन – अजित दि. देशपांडे
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचं बिगुल वाजलं : 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला मतमोजणी, आजपासून आचारसंहिता लागू । Maharashtra Vidhansabha Election
– मोठी बातमी ! दुपारी 12 वाजता होणार राज्यपाल नियुक्त सात आमदारांचा शपथविधी, ‘हे’ 7 जण बनणार आमदार
– तळेगावमधील कुंभारवाडा परिसराचे नामकरण श्री संत गोरोबाकाका नगर असे करण्याची मागणी । Talegaon Dabhade