Dainik Maval News : महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या मुंबईत सुरू आहे. यादरम्यान सोमवारी (दि. ३० जून) मावळचे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे दुःखद निधन झाले. विधानसभेचे माजी सदस्य दिवंगत कृष्णराव भेगडे यांना विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. दिवंगत सदस्य भेगडे यांच्या दुःखद निधनाबद्दल विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी या संदर्भातील शोक प्रस्ताव मांडला आणि दिवंगत सदस्याच्या स्मृतींना उजाळा दिला.
कृष्णराव भेगडे यांना विधानपरिषदेत श्रद्धांजली
माजी विधानपरिषद सदस्य कृष्णराव धोंडीबा भेगडे यांच्या निधनाबद्दल विधानपरिषदेत शोक प्रस्ताव मांडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सभापती प्रा.राम शिंदे यांनी शोक प्रस्ताव मांडला. सभापती प्रा. राम शिंदे यांनी कृष्णराव धोंडीबा भेगडे यांच्या निधनाबद्दल सभागृहाच्यावतीने दुःख व्यक्त केले.
- शोक प्रस्ताव मांडताना ते म्हणाले की, दिवंगत कृष्णराव धोंडीबा भेगडे यांचा जन्म १० ऑगस्ट १९३६ रोजी तळेगाव दाभाडे (ता. मावळ, जि. पुणे) येथे झाला. भेगडे यांनी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, मावळ या संस्थेच्या माध्यमातून गोर-गरीब विद्यार्थ्यांसाठी शाळा, महाविद्यालये सुरू केले. मावळ तालुक्यातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षणाच्या सोयी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते. त्यांनी तळेगाव जनरल हॉस्पिटल संस्था गोर-गरीब रुग्णांची सेवा करण्यासाठी निर्माण केली. त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, इंद्रायणी औद्योगिक सहकारी संस्थेचे चेअरमन, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणूनही उत्तम कार्य केले.
त्यांनी अनेक आंदोलनात भाग घेतला होता. कर्जग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. मावळ तालुक्यात जलव्यवस्थापन योजना राबवून त्यांनी हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली आणली होती. शेतकरी, शेतमजूर, कामगार यांच्या कल्याणासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले होते. दिवंगत भेगडे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे अनेक वर्ष सदस्य होते. सन १९७२ व १९७८ मध्ये पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघातून ते महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते तर, सन १९९२ ते १९९३ व १९९४ ते २००० या कालावधीत महाराष्ट्र विधानपरिषदेचे ते सदस्य होते.
विधानमंडळाच्या अनेक समित्यांवर त्यांनी काम केल्याची माहिती सभापतींनी दिली. या प्रस्तावावर सर्व सदस्यांनी स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली आणि शोक प्रस्तावास समर्थन दिले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार सुनील शेळके यांनी शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली ! खासदार संजय राऊत यांचा गंभीर आरोप, थेट मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
– पवन मावळात पावसाचा जोर वाढला, पवना धरण 66 टक्के भरले ! गतवर्षीपेक्षा 48 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा । Pawana Dam Updates
– VIDEO : कुणाच्याही डोळ्यात पाणी येईल… लातूर जिल्ह्यातील वृद्ध शेतकरी आजीआजोबांचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ