मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अर्थात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची विराट सभा काल (दि. 8 मे) सांगवी येथे पार पडली. या सभेला शिवसेना उबाठा चे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे प्रमुख उपस्थित होते. तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार सुप्रिया सुळे, आम आदमी पक्षाचे संज. सिंग, शेकापचे जयंत पाटील, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, आमदार सचिन आहिर आदी नेतेही उपस्थित होते. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, संजोग वाघेरे यांच्या विजयाचा विश्वासही व्यक्त केला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
‘ज्या शिवसेनेने तुम्हाला पंतप्रधानपदापर्यंत पोहोचवलं, त्यांना तुम्ही नकली सेना म्हणता? तुम्ही माझ्या नाही, महाराष्ट्राच्या पाठीत वार केला. भरभरून आशिर्वाद दिल्यानंतर देखील सगळे उद्योग-धंदे गुजरातला नेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात प्रेमाने अलिंगन दिले, तर आम्हीही देवू. पण, पाठीत वार केला, तर वाघनखाने पलटवार करू. जो महाराष्ट्राला नडेल, त्याला अशाच पध्दतीने महाराष्ट्र गाडेल,’ अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपावर तोफ डागली. ( Uddhav Thackeray Rally to campaign for Maval Lok Sabha candidate Sanjog Vaghere Patil at Sangvi )
तसेच, ‘मोदीजी 4 जूननंतर तुम्ही फक्त नरेंद्र मोदी राहाल. पंतप्रधान आमच्या इंडिया आघाडीचा होईल. इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्राचे लुटलेले वैभव पुन्हा महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही,’ असेही ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, ‘दिल्लीश्वरांची चावी असलेल्या दोन माकडांना आणखी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देखील घेता येत नाही. त्या माकडांना सांगतोय की बाप बदलण्याची गरज मला नाही, तुम्हाला आहे. माझ्या वडिलांचे नाव चोरून तुम्ही मते मागता. तुमच्या वडिलांचे नाव सांगितले, तर लोक दारात उभे करणार नाहीत. जो नकली शिवसेना म्हणेल, ते बेअकली आहे. त्यांच्याकडे आता काही मुद्दे राहिलेले नाहीत. मोदींना काही ठरवता येत नाही. त्यांचे काय करायचे, ते जनतेने ठरवलेले आहे. नोटबंदी हा काळा पैसा पांढरा करणारा निर्णय होता, हे न्यायमूर्तींनी म्हटले होते.’
- ‘हे मोदी सरकार नाही, गजनी सरकार आहे. त्यांना काल काय बोलले, ते आज आठवत नाही. अच्छे दिन म्हणत 15 लाख खात्यात येतील, म्हटले होते. पैसे भाजपच्याच खात्यात गेले. त्यांच्या सरकारमधील अर्थमंत्र्यांचे पतींनी इलेक्ट्रॉल बॉण्ड हा सर्वात मोठा घोटाळा म्हटलं आहे. कंत्राटी पद्धत आणली. अग्निवीरसारखी योजना चार वर्षे काम देता. बाकी सगळे कंत्राटी, मी कायमस्वरुपी, असे मोदींचे धोरण आहे. पण आता आम्ही तुमचे कंत्राट संपवणार असून 4 जूनला कंत्राटमुक्त करू.’
‘भाजपला घटना बदलायची आहे. बाबासाहेबांनी लिहिलेली घटना आम्ही पाळायची, हे त्यांना खुपते आहे. तुकारामांच्या वेळेला जो मंबाजी होता. तीच मानसिकता आज यांची आहे. तुम्ही आम्हाला काय हिंदूत्व शिकवता. जय श्रीराम, गणपत्ती बाप्पा मोरया आम्ही पण म्हणतो. जय भवानी, जय शिवाजी या जयजयकारात झोपलेल्या जागा करण्याची ताकद आहे.’
‘मोदी तुम्ही आमच्या सुखात मीठ कालवत आहात. तुम्ही देशाचे पंतप्रधान असताना गुजरात आणि देशात भिंत का बांधत आहात ? तोही आमचा आहे. मात्र, महाराष्ट्रात कंपनी ठेवायची असेल, तर मराठी माणसाला नोकरी द्यावी लागेल. भाजपला राजकारणात मुले होत नाहीत. त्यात आमचा दोष काय ? तुम्हाला मुले होत नाहीत. वडिलही नाहीत. म्हणून मी भाजपला भेकड म्हणतो. जनतेचे प्रेम तुम्ही कमावू शकलेले नाहीत. माझे शिवसैनिक माझे निवडणूक रोखे आहेत,’ असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
‘भुताची भीती वाटली की राम राम म्हणायचे. आता यांना पराभवाची भीती वाटली की राम राम करत फिरतात. मोदीजी गल्लीबोळात प्रचारासाठी जात आहेत. मुंबईमध्ये तुम्हाला रोड शो करावा लागतो. मग, दहा वर्षात काय कमावले ? आजच त्यांना रस्त्यावर आणले आहे. 4 जूनला आणखी रस्त्यावर आणणार आहोत. त्यांनी मागे अचानक टीव्हीवर येऊन नोटबंदी केली होती. तसेच मोदीजी 4 जूननंतर तुम्ही फक्त नरेंद्र मोदी राहाल. पंतप्रधान आमच्या इंडिया आघाडीचा होईल. तुम्ही जसे नोटाबंदी केली, तसा महाराष्ट्र तुमची नाणेबंदी करेल.’
संजोग वाघेरेंना लोकसभेत पाठवा – उद्धव ठाकरे
‘महाराष्ट्रात सर्वात पहिली उमेदवारी मी संजोग वाघेरे पाटील यांना जाहीर केली होती. त्यांचा प्रचार करण्याची गरज देखील आता उरलेली नाही. हे समोर बसलेला जनसमुदाय पाहून स्पष्ट झालेले आहे. त्यांना मावळमधून प्रचंड बहुमताने विजयी करून लोकसभेत पाठवा,’ असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदारांना केले.
अधिक वाचा –
– रोटरी क्लबच्या माध्यमातून आणि पॉस्को कंपनीच्या वतीने तळेगाव दाभाडे वाहतूक पोलिसांना संगणक संच भेट । Talegaon Dabhade
– खर्चात तफावत आढळल्याने श्रीरंग बारणे आणि संजोग वाघेरे यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी बजावली नोटीस ! Maval Lok Sabha
– दुर्दैवी ! गावी आलेल्या आत्याचा अपघाती मृत्यू, शिरगाव-कासारसाई रस्त्यावरील घटना, अज्ञात दुचाकी चालकावर गुन्हा