Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सुनिल शेळके यांना तिकीट मिळाल्याने अपक्ष उमेवारी जाहीर केलेले बापूसाहेब भेगडे यांना सर्वांत आधी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी आपला पाठींबा जाहीर करत पक्षाच्या पदाचे राजीनामे दिले. त्यानंतर महाविकासआघातील प्रमुख घटक पक्ष शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने देखील बापूसाहेब भेगडे यांना पाठींबा जाहीर केला. त्यानंतर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून देखील बापूसाहेब भेगडे यांना पाठींबा जाहीर करण्यात आला आहे.
बापूसाहेब भेगडे यांच्या निमित्ताने सुनिल शेळके यांचे सर्वच राजकीय विरोधक एकत्र येताना दिसत आहेत. पहिल्यापासून महाविकासआघाडीने आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. महाविकासआघाडी अपक्ष उमेदवाराला पाठींबा देणार नाही, आपला स्वतंत्र उमेदवार देइल असे जाहीर केले होते. परंतु दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपला पाठींबा बापूसाहेब भेगडे यांना जाहीर केला. त्यापाठोपाठ ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठींबा देखील भेगडे यांना मिळाला आहे. आता फक्त काँग्रेसची भूमिका समोर येणे बाकी आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून पाठींबा जाहीर –
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना उपनेते रविंद्र मिर्लेकर, शिवसेना उपनेते पुणे जिल्हासंपर्क प्रमुख आमदार सचिन अहिर यांच्या सूचनेनुसार, लोकसभा संघटक संजोग वाघिरे-पाटील, जिल्हाप्रमुख अॅड गौतम चाबुकस्वार, शिवसेना मावळ विधानसभा संपर्कप्रमुख प्रभाकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मावळ तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सर्व शहरप्रमुख, युवासेना, महीला आघाडी, वाहतूक सेना, पक्षाच्या सर्व अंगीकृत सघटना, आजी-माजी नगरसेवक व सर्व शिवसैनिकांना कळविण्यात येत आहे की मावळ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना महाविकास आघाडीच्या माध्यमांतून ‘शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाच्या वतीने जाहीर पाठींबा देत आहोत, अशी माहिती तालुका प्रमुख आशिष ठोंबरे यांनी दिली.
काँग्रेसच्या गोटाच अद्याप चर्चा –
विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने मावळ विधानसभा काँग्रेस पक्षाची महत्वाची मिटिंग सध्या देहूरोड येथे सुरु आहे. देहूरोड शहर काँग्रेस पक्ष कार्यालय येथे ही मिटिंग आयोजित करण्यात आली असून पुणे जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष संग्राम अशोकराव मोहोळ आणि इतर पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ विधानसभा निवडणूक संदर्भात उमेदवारी देण्याबाबत चर्चासत्र होणार आहे. अशी माहिती तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी दिली. काँग्रेसने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. किंवा बापूसाहेब भेगडे यांना पाठींबा देखील दिलेला नाही. या सभेत पाठींबा देणे किंवा स्वतंत्र उमेदवार देणे याबाबत निर्णय होऊ शकतो, असे बोलले जात आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘आम्ही पक्षाचा आदेश मानणार, महायुतीच्या उमेदवाराचे काम करणार’ ; तळेगाव भाजपा पदाधिकाऱ्यांचा सुनिल शेळकेंना पाठींबा
– मावळ विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत ‘या’ तीन उमेदवारांचे अर्ज दाखल । Maval Vidhan Sabha
– मावळात शरद पवारांचा अजितदादांना धक्का ! अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचं काम करण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश