Dainik Maval News : वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये 17 प्रभागातून थेट जनतेतून नगराध्यक्ष आणि 17 नगरसेवक पदांच्या जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी रविवारी, दि. 21 डिसेंबर रोजी होणार आहे. दरम्यान 2 डिसेंबरला मतदान झाल्यानंतर तब्बल 19 दिवस मतमोजणी लांबल्याने निवडणूक निकालाबाबत नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. मतमोजणी प्रक्रिया 4 फेऱ्यांमध्ये होणार असून अवघ्या एक तासात संपूर्ण निकाल लागेल, एक मशीन असलेल्या प्रभागात अवघ्या 10 मिनिटांत निकाल लागेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
वडगाव नगरपंचायतसाठी २ डिसेंबर रोजी मतदान झाले होते. सुरुवातीला मतमोजणी ३ डिसेंबरला होणार होती; मात्र उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयानुसार मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना तब्बल १९ दिवस निकालाची प्रतीक्षा करावी लागली. मतदानानंतर आत्मपरीक्षणासाठी भरपूर कालावधी मिळाल्याने विजयाची खात्री असलेल्या उमेदवारांनी ढोल–ताशे, बेंजो, फटाके आणि गुलाल उधळण्याची तयारी सुरू केली आहे.
वडगाव मावळ नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अबोली मयूर ढोरे आणि भारतीय जनता पार्टी महायुतीच्या अँड. मृणाल गुलाबराव म्हाळसकर यांच्यात थेट लढत झाली. तसेच, बहुजन विकास आघाडीकडून वैशाली उदागे, तर अपक्ष म्हणून नाझमीन शेख रिंगणात आहेत. वैयक्तिक करिष्म्यामुळे कोण किती मते खेचतो, यावर विजयी उमेदवाराचे मताधिक्य अवलंबून असणार आहे. नगरसेवकपदासाठीही सर्व प्रभागांत चुरशीची लढत झाल्याने सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा तेलभाते व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्य अधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार, दि. 21 रोजी सकाळी दहा वाजता नगरपंचायत सभागृहामध्ये मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. इत्यादी सर्व उमेदवारांच्या उपस्थितीत स्ट्रॉंग रूम उघडून मतपेट्या बाहेर काढण्यात येणार असून, सर्व प्रक्रियेची व्हिडिओ शूटिंग होणार आहे.
मतमोजणी प्रक्रियेसाठी सात टेबल लावण्यात आलेले आहेत. एकूण चार फेऱ्या होणार आहेत. ज्या प्रभागात दोन मतपेट्या होत्या, त्या प्रभागाची मोजणी एकाच टेबलवर होणार आहे. त्यामुळे अशा प्रभागांची मोजणी दोन फेऱ्यांमध्ये होईल. इतर सर्व प्रभागांची मोजणी एकाच फेरीत संपणार आहे. एका फेरीला साधारणतः 15 मिनिटांचा कालावधी लागणार असल्याने एक ते दीड तासात मतमोजणी पूर्ण होणार आहे.
मतमोजणी प्रक्रियेसाठी उमेदवार किंवा उमेदवाराचा प्रतिनिधी व एक मतमोजणी प्रतिनिधी याप्रमाणे एका उमेदवाराच्या फक्त दोन प्रतिनिधींनाच उपस्थित राहता येणार आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना सात प्रतिनिधी देता येणार आहेत. संबंधित प्रतिनिधींना मतमोजणीच्या ठिकाणी येण्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार ठेवण्यात आलेले आहे. ज्या प्रभागाची मोजणी पूर्ण होईल त्या प्रभागातील प्रतिनिधींना सभागृहाच्या बाहेर जावे लागणार आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– अन्यथा दहा दिवसांनंतर सोमाटणे फाटा आणि वरसोली येथील टोलनाके बंद पाडणार ; आमदार सुनील शेळकेंचा इशारा
– जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम
– कामात हलगर्जीपणा नको, आमदार शेळकेंची अधिकारी, ठेकेदारांना तंबी ; ‘त्या’ ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचे निर्देश
– वडगाव मावळ पोलिसांकडून दोन ऑर्केस्टा बार वर छापे , चौघांवर गुन्हा दाखल । Maval Crime
