Dainik Maval News : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबईत सुरू आहे. शुक्रवारी (६ मार्च) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा 7.69 लाख कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्यातील अनेक महत्वाच्या योजना, प्रकल्प अन् विकासकामांचा समावेश आहे. त्याअनुषंगाने या अर्थसंकल्पातून मावळ तालुक्याच्या वाट्याला देखील अनेक गोष्टी मिळाल्याचे दिसून येते.
पायाभूत सुविधांसाठी विशेष तरतूद :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसित महाराष्ट्राच्या ध्येयाकडे वाटचाल करणारा अर्थसंकल्प असल्याने या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने मावळ तालुका आणि मावळ तालुक्याच्या भोवतालच्या अनेक महत्वाच्या रस्ते विकास प्रकल्पांसाठी भरीव तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
– अर्थसंकल्पात पुणे ते लोणावळा तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गिकेच्या ५१०० कोटी रुपये किंमतीच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाचा पिंपरी चिंचवड, आकुर्डी आणि तळेगाव या औद्योगिक प्रकल्पांना थेट लाभ होईल.
– अर्थसंकल्पात पूर्वीच मान्यता मिळालेल्या तळेगाव – चाकण ह्या ६४९९ कोटी रुपये किमतीच्या २५ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्गाचे काम हाती घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
तसेच आमदार सुनील शेळके यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हॅन्डलवर केलेल्या पोस्टनुसार, मावळ तालुक्यातील प्रमुख चार रस्ते विकासकामांसाठी अर्थसंकल्पातून निधी उपलब्ध झाला आहे. ज्यात,
– मुंबई – पुणे जुना रा.मा. १२६ किमी ४/३०० ते ५/३०० ची सुधारणा करणे. (कामशेतमधील लांबी) : १ कोटी ५० लक्ष
– सोमाटणे परंदवडी शिवणे कडधे रस्ता प्रजिमा २८ किमी ०१/०० ते ०३/०० ची सुधारणा करणे. (सोमाटणे द्रुतगती महामार्ग पूल ते परंदवडी) : १० कोटी
– रा.म.मा. ०४ कान्हे फाटा ते वडेश्वर सावळा रस्ता प्रजिमा २२ किमी ०/०० ते १/०० ची सुधारणा करणे. (रा.म.मा. ०४ ते कान्हे हद्द) : ६ कोटी ५० लक्ष
– सोमाटणे दारुंब्रे – कासारसाई पाचाणे- पुसाणे – ओव्हळे रस्ता प्रजिमा १५७ किमी ०३/०० ते ०५/७०० ची सुधारणा करणे. (शिरगाव ते गोडूंब्रे पूल) : ७ कोटी
अशा रितीने अर्थसंकल्पातून मावळातील रस्ते विकासकामांना जवळपास 25 कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे.
सोबतच., जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांचे जन्मस्थळ आणि जीर्ण घराचे जतन संवर्धनासाठी विकास आराखडा तयार करणे, या कामाचीही घोषणा अर्थसंकल्प सादर करताना कऱण्यात आली. तसेच, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादी समाविष्ट झालेल्या मावळ तालुक्यातील किल्ले लोहगडाचे जतन व संवर्धनाचे काम हाती घेण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात सांगितले.
आमदार सुनील शेळके यांनी मानले आभार –
“अर्थसंकल्प २०२६ मध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मावळ तालुक्याच्या विकासासाठी केलेल्या महत्वपूर्ण घोषणांबद्दल महायुती सरकारचे मावळवासियांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच, मावळ तालुक्यातील विविध रस्ते सुधारणा व विकासकामांसाठी जवळपास २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या निधीमुळे तालुक्यातील रस्त्यांची स्थिती सुधारून नागरिकांना सुरक्षित व सुकर प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे,” अशी प्रतिक्रिया आमदार सुनील शेळके यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हॅन्डलवर दिली आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे यांचा राजीनामा !
– महत्वाची बातमी ! राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांची नोंद सात बारा उताऱ्यावर होणार
– मावळ पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची सोमवारी होणार निवड
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्याच्या वाट्याला नक्की काय मिळाले ?