Dainik Maval News : वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 चा निकाल जाहीर झाला आहे. दिनांक 21 डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालानुसार वडगाव नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता आली असून नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अबोली मयूर ढोरे विजयी झाल्या आहेत, तर एकूण 17 नगरसेवकांमध्ये राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्हावरील 9 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे आता अंतिम निकालानंतर वडगाव नगरपंचायतीचा उपनगराध्यक्ष कोण होणार, याची चर्चा होत आहे.
वडगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे निवडून आलेले 9 नगरसेवक आणि अपक्ष उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक 5 मधून निवडून आलेल्या रुपाली अतुल ढोरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा नगरसेवक झाले आहेत. या दहा नगरसेवकांपैकी सहा महिला असून चार पुरुष नगरसेवक आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा नगरसेवक
पुनम विकी भोसले ( प्रभाग 1) सुनिता राहुल ढोरे ( प्रभाग 4) अजय महेंद्र भवार ( प्रभाग 7 ) माया अमर चव्हाण ( प्रभाग 8 ) आकांक्षा योगेश वाघवले ( प्रभाग 10 ) सुनील गणेश ढोरे ( प्रभाग 11 ) गणेश सोपान म्हाळसकर ( प्रभाग 12 ) अजय बाळासाहेब म्हाळसकर ( प्रभाग 13 ) वैशाली गौतम सोनावणे ( प्रभाग 14 ) आणि नुकताच प्रवेश केलेले अपक्ष उमेदवार रुपाली अतुल ढोरे ( प्रभाग 5 )
उपनगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत असलेले नगरसेवक
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निवडून आलेल्या सर्वच नगरसेवकांकडे उपनगराध्यक्ष पदाचे दावेदार म्हणून पाहिलं जातं. परंतु नगराध्यक्षपदी महिला असल्याने पहिल्या टप्प्यात उपनगराध्यक्ष पदाची संधी ही पुरुष नगरसेवकाला मिळण्याची अधिक शक्यता आहे. या अर्थाने पुरुष नगरसेवकांमधील अजय महेंद्र भवार (प्रभाग 7), सुनील गणेश ढोरे (प्रभाग 11), गणेश सोपान म्हाळसकर (प्रभाग 12) आणि अजय बाळासाहेब म्हाळसकर (प्रभाग 13) ही नावे चर्चेत येतात. परंतु अनुभव आणि राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आणण्यात सिंहाचा वाटा असणारे सुनील गणेश ढोरे हे पुरुष नगरसेवकांपैकी उपनगराध्यक्ष पदाचे प्रमुख प्रबळ दावेदार मानण्यात येत आहेत. त्या खालोखाल सामान्य कार्यकर्ता म्हणून आणि जातीय समीकरण लक्षात घेता, अजय महेंद्र भवार यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो.
- परंतु, लाडक्या बहिणींच्याच हाती सत्ता सुत्र देण्याचे जर पक्ष श्रेष्ठींनी निश्चित केले, तर उर्वरित सहा महिला नगरसेवकांच्याही नावांपैकी एकावर शिक्कामोर्तब होऊ शकते. या होऱ्यानुसार, उर्वरित सहा नगरसेवकांपैकी वडगावात सर्वाधिक मताने निवडून आलेल्या पुनम विकी भोसले, एसटी प्रवर्गातून सर्वात प्रतिकूल परिस्थितीतून निवडून आलेल्या वैशाली गौतम सोनावणे किंवा सलग दोनदा नगरसेवक झालेल्या माया अमर चव्हाण यांची नावे सर्वाधिक चर्चेत आहेत.
परंतु पक्ष नेतृत्वाने धक्कातंत्र देत नवीन नेतृत्वाकडे सुत्रे सोपविण्याचे ठरविल्यास, बाजारपेठ भागातील प्रतिनिधीत्व करणाऱ्या आकांक्षा योगेश वाघवले किंवा एक मताने विजयी होण्याचा चमत्कार करणाऱ्या सुनीता राहुल ढोरे अथवा पक्षविरोधात जाऊन निवडणूक लढवून विजय मिळविलेल्या आणि तात्काळ पक्षात प्रवेश केलेल्या रुपाली अतुल ढोरे यांच्याही नावापैकी एकावर शिक्कामोर्तब होऊ शकते.
उपनगराध्यक्ष पदासाठी चर्चेत असलेले पाच प्रमुख नावे
सुनील गणेश ढोरे, अजय महेंद्र भवार, पुनम विकी भोसले, माया अमर चव्हाण, वैशाली गौतम सोनावणे
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगाव, लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस, तर तळेगाव दाभाडे शहरात भाजपाचा नगराध्यक्ष ; तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक
– पतीचा पराभव, पण पत्नीचा विजय ; कुठे १ मताने तर कुठे २ मताने उमेदवार विजयी ! मावळातील वडगाव नगरपंचायतीचा निकाल ठरला लक्षवेधी
– Dehu : देहू-येलवाडी रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी, लवकरच होणार काँक्रीटीकरण ; ‘पीएमआरडीए’कडून कार्यारंभ आदेश

