वडगाव मावळ, दि. ५ (प्रतिनिधी) : नुकत्याच झालेल्या वडगाव नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी या दोन पक्षांमध्ये प्रामुख्याने लढत झाली. यामध्ये नगराध्यक्ष पदाबरोबर ९ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजयी होत एकहाती सत्ता मिळवली. त्याचबरोबर भाजपा पक्षाचे ६ नगरसेवक व २ अपक्ष उमेदवार म्हणून नगरसेवक पदी विराजमान झाले.
वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये एकूण नगरसेवक पदाच्या सतरा जागांपैकी पाच जागा या इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित होत्या. प्रभाग २, ४, ६, ८, १० हे प्रभाग ओबीसी करिता आरक्षित होते. पैकी महिला आरक्षित ३ प्रभाग तर ओबीसी सर्वसाधारण २ प्रभाग होते. एकूण पाच जागांवर भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून दहा उमेदवार रिंगणात होते. पैकी प्रत्यक्षात केवळ एक उमेदवार (महिला) हा मूळ ओबीसी तर उर्वरित नऊ हे कुणबी समाजातील होते.
खरेतर मराठा आरक्षणाच्या लढाईत सरसकट कुणबी दाखले दिल्यास मूळ ओबीसींवर अन्याय होईल, असा एक विचार मूळ ओबीसींकडून समोर आला होता किंवा आजही आहे. मराठा आरक्षणाच्या लढाईदरम्यान पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कुणबी दाखले काढण्यात आले. अनेक गावांतील राजकीय चित्र यामुळे थेट बदलून गेले. ओपन आणि ओबीसी या जागांवर एकगठ्ठा गावातील बहुसंख्य मराठा समाजाचे वर्चस्व दिसू लागले. वडगाव नगरपंचायत हे त्याचेच उदाहरण आहे. सर्वाधिक संख्या असलेल्या मराठा समाजातील उमेदवारांकडे कुणबी दाखले देखील असल्याने प्रभाग ओपनचा असेल किंवा ओबीसीचा त्यांची दावेदारी ठरलेली होती. यातून सामान्य मूळ ओबीसी कुटुंबातील उमेदवारांवर मात्र अन्याय झाला. त्यातूनच दहापैकी नऊ कुणबी तर केवळ एक मूळ ओबीसी उमेदवार रिंगणात दिसला.
वडगाव शहरात सर्वच पक्षांत सामान्य ओबीसी कुटुंबातील कार्यकर्ता देखील झटून सामाजिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रमात अग्रेसर असतात. पण निवडणूक आली की त्यांना सक्षम उमेदवार या कॅटेगिरीखाली डावलले जाते. मूळ ओबीसींना यामुळे उमेदवारी दिली जात नाही. हे कार्यकर्ते नेत्यांच्या, गावातील पुढाऱ्यांच्या मागे निवडणुकीचे काम करताना दिसतात.
परंतु आता आता प्रत्यक्षात निवडणुका झाल्यानंतर काहींचा जय, काहींचा पराजय झाला असला तरीही पराभूतांच्या पदरी स्वीकृत नगरसेवक पद देण्यापेक्षा डावललेल्या मूळ ओबीसींना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी मिळणार का? की पुन्हा त्याच लोकांच्या गळ्यात माळ पडणार, जे पराभूत झाले आहेत? असा सवाल कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे.
वडगाव नगरपंचायत निवडणूक :
वडगाव शहरात अनेक ओबीसी कार्यकर्ते विविध पदावर काम करत आहेत, पण निवडणूक आली की त्यांना बाजूला केले जाते. वडगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वडगाव शहर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील एका महिला उमेदवाराने माघारी घेत पाठिंबा दिला. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीला शिवसेना (शिंदे) गटाने देखील पाठिंबा दिला. त्या कार्यकर्त्यांचा देखील विचार होणार का? वडगाव शहरात विविध संस्थेवर काम करणारे अतुल राऊत, सोमनाथ धोंगडे, मयुर गुरव, रोहित गिरमे, आरती राऊत अशा अनेक सामान्य कुटुंबातील ओबीसी कार्यकर्त्यांचा समावेश आहे. अशा सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या गळ्यात स्वीकृत नगरसेवक पदाची माळ पडणार का? याची चर्चा सध्या होत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– श्री लोहगड ते श्री भिवगड : मावळ तालुक्यात तब्बल 23 वर्षांनंतर धारातीर्थ गडकोट मोहीम – जाणून घ्या मोहिमेबद्दल
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जानेवारी महिन्याचे वेळापत्रक जाहीर
– धक्कादायक ! खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीला संपवलं ; रस्त्यात गाडी अडवून केला प्राणघातक हल्ला
– कामशेतमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांकडून एकेरी वाहतुकीचा पर्याय, 1 जानेवारीपासून अंमलबजावणी ; पाहा कुठून एन्ट्री, कुठे होणार एक्झिट

