यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहने चालवणाऱ्या वाहन चालकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. वाहतूक विभागाने आता द्रुतगती मार्गावर धावणाऱ्या वाहनांच्या वेगमर्यादेबद्दल नवीन अधिसुचना जारी केली आहे. त्यानुसार एक्सप्रेस वेवरील समतल भाग आणि घाट भाग (बोरघाट) या ठिकाणी वाहनांचा अधिकतम वेग किती असेल, याची मर्यादा नव्याने ठरवून देण्यात आलीये. त्यामुळे नव्या नियमांनुसार खंडाळा बोर घाटात वाहनांचा वेग कमी होऊन अपघातही टळतील, असे सर्वांनाच अपेक्षित आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
वाहतूक विभागाचे अपर पोलिस महासंचालक सुखविंदर सिंह यांच्या सहीनिशी परवानगीने ही अधिसुचना काढण्यात आलीये. त्यानुसार यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग अर्थात मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील बोरघाट भागात किलोमीटर 35.500 ते 52.000 याकरिता वाहनांच्या वेगमर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, एम-1 श्रेणीतील वाहनांसाठी समतल भागातील वेगमर्यादा ही ताशी 100 किमी असेल तर घाटात ही वेगमर्यादा 60 किमी प्रतितास असेल. त्यानंतर एम-2 आणि एम-3 श्रेणीतील वाहनांसाठी समतल भागातील वेगमर्यादा ही ताशी 80 किमी असेल तर घाटात ही वेगमर्यादा 40 किमी प्रतितास असेल. आणि सर्व एन श्रेणीतील वाहनांसाठी समतल भागातील वेगमर्यादा ही ताशी 80 किमी असेल तर घाटात ही वेगमर्यादा 40 किमी प्रतितास असेल, असे आदेश काढण्यात आलेत. पुर्वीप्रमाणेच, एक्सप्रेस वेवर दुचाकी, चारचाकी मोटार रिक्षा आणि तीन चाकी मोटार वाहने, रिक्षा यांना परवानगी नसल्याचेही स्पष्ट केले आहे. ( Yashwantrao Chavan Mumbai Pune Expressway New speed limit for vehicles )

अधिसुचनेची पार्श्वभूमी –
यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग हा एकूण 94 कि.मी. चा असून या महामार्गावर कि.मी. 35.500 ते कि.मी. 52.000 पर्यंत घाट भाग (बोरघाट) आहे. सद्यस्थितीत या द्रुतगती महामार्गावरील समतल भागासाठी असलेली वेगमर्यादा 100 कि.मी. प्रति तास असून घाट भागामध्ये आल्यानंतर वेगमर्यादा 50 कि.मी. प्रति तास आहे. व्यवहारिक दृष्टया घाट भागातील नमुद वेग मर्यादा हलक्या वाहनांसाठी अत्यंत कमी असुन पुणे ते मुंबई वाहिनीवर अति तीव्र उतार असल्याने, नमुद ठिकाणी वाहनांना समतल भागातून 100 कि.मी. प्रति तास या प्रमाणे प्रवास केल्यानंतर घाट भागात आल्यावर वाहनाची वेग मर्यादा 50 कि.मी. वर आणताना वाहन चालकांना अडचणी निर्माण होतात तसेच त्या दरम्यान वाहन चालकाने वाहनांचा वेग जलद गतीने कमी केल्याने अपघातांचे प्रमाण देखील अधिक असल्याचे दिसून आले आहे, असा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
त्यानुसार, यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गाचे रस्त्याचे डिझाईन आणि घाट सेक्शनमध्ये झालेल्या रस्त्यांचे रंदीकरण तसेच एमएसआरडीसी कार्यालय पुणे, परिवहन विभाग, आयआरबी इंन्फा डेव्हलपमेंट कार्यालय, पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस रायगड परिक्षेत्र, पोलीस निरीक्षक, महामार्ग पोलीस पनवेल विभाग, प्रभारी पोलीस निरीक्षक म.पो. केंद्र बोरघाट, प्रमुख आरेखक वाहतुक अभियांत्रिकी पथक यांची दिनांक 15 एप्रिल रोजी याबाबत झालेल्या बैठकीतील बोरघाटातील वेगमयदिविषयीचे अभिप्राय विचारात घेता, सर्वानुमते मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाटात हलक्या वाहनांची वेगमर्यादेत बदल करणे आवश्यक असल्याचे निश्चित झाले होते. त्यानुसार ही अधिसुचना काढण्यात आली आहे.
अधिक वाचा –
– वडगावमधील अनंता कुडे आणि डॉ. तृप्ती शहा यांना सामाजिक पुरस्कार प्रदान । Vadgaon Maval
– शिळींब येथे हॅपी स्कूल आणि हॅपी अंगणवाडी प्रोजेक्टचे लोकार्पण; विद्यार्थ्यांची पायपीट थांबावी याकरिता सायकलींचे वाटप
– मावळ विधानसभा मतदारसंघात बऊर येथील अनधिकृत जाहिरात फलकावर कारवाई । Maval Lok Sabha