Dainik Maval News : इंदुरी जवळील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीच्या डोहात पोहण्यासाठी उतरलेल्या तरूणांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज, बुधवारी (दि.2 एप्रिल) रोजी घडली. अमन शफी रेहमानी (वय 21 वर्षे, रा. कुदळवाडी, चिखली) असे बुडून मृत्यू पावलेल्या तरूणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुदळवाडी, चिखली येथील मित्रांचा एक ग्रुप कुंडमळा येथे फिरण्यासाठी आला होता. त्यातील चार पाच जण पोहण्यासाठी इंद्रायणीच्या पाण्यात उतरले. परंतु पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तीन जण बुडू लागले. त्यातील दोन जणांना वाचविण्यात यश आले, परंतु अमनचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
- घटनेची माहिती मिळताच तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे आपदा मित्र घटनास्थळी दाखल झाले. साधारण पाचच्या सुमारास तरूण बुडाला होता, आपदा मित्रांनी अथक प्रयत्न करून सहा वाजेपर्यंत त्याला पाण्याबाहेर काढले. उपचारासाठी त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
स्थानिक ग्रामस्थांसह आपदा मित्र मावळ, वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा संस्थेचे निलेश गराडे, भास्कर माळी, गणेश गायकवाड, रवी कोळी, विनय सावंत, सागर भेगडे, अनिश गराडे यांनी शोधकार्यात मदत केली. तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत जाधव व त्यांचे सहकारी याप्रसंगी उपस्थित होते. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान, ह्या दुर्दैवी घटनेबद्दल कुंडमळा परिसरात व कुदळवाडी, चिखली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच, अमन रेहमानी याच्या आकस्मित निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्याचा विकास व्हावा ; शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळावा – आमदार सुनिल शेळके
– मावळ तालुक्यातील इंदुरी येथील भुईकोट किल्ल्यावर 61 फुटी भगव्या ध्वजाचे लोकार्पण । Maval News
– मोठी बातमी : श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी जालिंदर मोरे यांची निवड ; चुरशीची लढतीत 63 मतांनी विजयी । Dehu News

