Dainik Maval News : राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी (दि. 13) पत्रकार परिषद घेत राज्यातील रखडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा केली. निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यात 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर केली असून यात पुणे जिल्हा परिषद आणि मावळ पंचायत समिती चा समावेश आहे. निवडणूक जाहीर झाल्याने मावळ तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले असून राजकीय पक्षांच्या बैठकांचे सत्र सुरु झाले आहे.
मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण 5 गट आहेत, तर पंचायत समिती करिता एकूण 10 गण आहे. टाकवे बुद्रुक – नाणे जि.प. गट (अनुसूचित जमाती), इंदुरी – वराळे जि.प. गट (सर्वसाधारण महिला), खडकाळे – कार्ला जि.प. गट (सर्वसाधारण महिला), कुसगांव बुद्रुक – काले जि.प. गट (सर्वसाधारण) आणि सोमाटणे – चांदखेड जि.प. गट (सर्वसाधारण महिला) असे जिल्हा परिषदेचे 5 गट आहेत. तर, पंचायत समिती मावळचे टाकवे बुद्रुक (सर्वसाधारण स्त्री), नाणे (अनुसूचित जमाती स्त्री), वराळे (सर्वसाधारण), इंदुरी (सर्वसाधारण), खडकाळे (अनुसूचित जाती), कार्ला (सर्वसाधारण स्त्री), कुसगांव बुद्रुक (सर्वसाधारण), काले (सर्वसाधारण स्त्री), सोमाटणे (नागरिकांचा मागास प्रवर्ग), चांदखेड (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री) असे एकूण 10 गण आहेत.
मावळ तालुक्यात सध्याची राजकीय परिस्थिती पाहता विद्यमान आमदार सुनील शेळके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असल्याने, तसेच नुकत्याच झालेल्या नगरपरिषद – नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दबदबा दिसून आल्याने जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने देखील तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट स्थितीत दिसून येतो. सोबत, भक्कम पक्ष संघटन, नेतृत्वाची चांगली फळी आणि इच्छुकांची संख्या या जोरावर भाजपा पक्षही आपली ताकद जोखून आहे. त्यासोबत एकनाथ शिंदे यांची शिवसेना, शिवसेना उबाठा, काँग्रेस (आय), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ), वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हेही पक्ष आपापल्या पद्धतीने ताकद बांधून आहे. जोडीला अनेक लहान सहान पक्ष, संघटना आहे. हे सर्वच पक्ष जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकीच्या अनुंषगाने तयारीला लागले आहेत. लवकरच युती, आघाडी यांचे चित्र स्पष्ट होईल.
परंतु, आजपर्यंत मागील काही दिवसांत वेगवेगळ्या वेळी मावळ तालुक्यात राजकीय पक्षांकडून आपले काही अधिकृत उमेदवार जिल्हा परिषद, पंचायत समिती साठी जाहीर करण्यात आलेले आहे. तसे, पाहता कोणत्याच पक्षाने अधिकृतरित्या अद्याप पक्षाच्या लेटरहेडवर किंवा पक्षाच्या निवडणूक समितीकडून तशी अधिकृत घोषणा प्रसिद्धीस दिलेली नाही. परंतु तालुक्यातील त्या-त्या पक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कोअर कमिटी सदस्य यांनी नावांची घोषणा केलेली असल्याने, जाहीररित्या केलेली असल्याने सद्यस्थिती तालुक्यात एकूण सात उमेदवार तरी अधिकृत उमेदवार असल्याचे प्रथमदर्शनी दिसतात.
पक्ष आणि त्यांच्याकडून उमेदवारी जाहीर झालेले उमेदवार (कंसात गट / गण )
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) – सुनीता मनोज येवले (चांदखेड पं.स. गण) , प्राची देवाभाऊ गायकवाड (टाकवे बुद्रुक पं.स. गण) आणि दीपाली दीपक हुलावळे (खडकाळे-कार्ला जि.प. गट)
भारतीय जनता पार्टी – सुवर्णा बाळासाहेब घोटकुले (चांदखेड गण), रंजना सुरेश गायकवाड (कार्ला पं.स. गण)
शिवसेना (एकनाथ शिंदे) – अश्विनी सोमनाथ कोंडे (टाकवे बुद्रुक पं.स. गण)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे – अश्विनी अमोल भेगडे (कार्ला पं.स. गण)
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मावळ पंचायत समिती निवडणूक २०२६ : दहापैकी ‘या’ दोन गणातील उमेदवार असणार थेट सभापती पदाचा दावेदार – पाहा कुठल्या गणात कोणते आरक्षण
– मावळातील ‘या’ झेडपी गटाचा उमेदवार असेल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा दावेदार – पाहा मावळात कुठल्या गटात कोणते आरक्षण
– मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच गट, तर पंचायत समितीचे दहा गण – पाहा गट अन् गणनिहाय मतदारसंख्या ; काले गणात सर्वाधिक मतदार
– अखेर बिगुल वाजले ! राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा, ‘या’ 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समित्यांची होणार निवडणूक
