Dainik Maval News : मावळ तालुक्यातील १५ गावांमध्ये कातकरी बांधवांसाठी घरकुलांची कॉलनी बांधण्यात येणार आहे. गायरानातून जागा उपलब्ध झाल्याने घरकुलांपासून वंचित राहिलेल्या सुमारे १८० कातकरी कुटुंबांना यामुळे नवीन वर्षात हक्काचे घर मिळणार आहे.
केंद्र शासनाच्या पीएम जनमनमधून प्रामुख्याने कातकरी कुटुंबांना लाभ दिला जातो. आजवर जागेअभावी तालुक्यातील अनेक बेघर कुटुंबांना प्रधानमंत्री आवास व पीएम जनमन योजनेतून घरकुलांचा लाभ देता येत नव्हता, यामुळे ते शासनाच्या घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित राहिले होते.
दरम्यान, भूमिहीन व बेघर कुटुंबांच्या घरकुलांसाठी शासकीय गायरान अथवा वन खात्याकडून जागा उपलब्ध करून देण्यासाठी मावळ पंचायत समितीचे प्रयत्न सुरू होते, याअंतर्गत काही लाभार्थ्यांच्या जागेसाठीचे प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठविण्यात आले होते. त्यानुसार १५ गावातील १८० कातकरी कुटुंबांना घरकुले बांधण्यासाठी गायरान जागा मंजूर झाली आहे, अशी माहिती मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांनी दिली.
मंजूर गायरान जागेच्या ठिकाणी कातकरी बांधवांसाठी घरकुलांची नियोजनबद्ध कॉलनी बांधण्यात येत आहे. अनेक ठिकाणी या कामाला सुरुवातही झाली आहे. आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात मॉडेल ठरू शकेल, अशा पद्धतीने या घरकुलांच्या कॉलनींचे काम करण्यात येणार असून लवकरच सर्व ठिकाणची कामे पूर्ण करण्याचा संकल्प आहे, अशी माहिती प्रधान यांनी दिली.
गावनिहाय घरकुलांची संख्या
१. कार्ला – १८,
२. कल्हाट – १०,
३. टाकवे बुद्रुक (बेलज) – १४,
४. फळणे – ९,
५. कुसगाव बुद्रुक – १७,
६. वराळे – ६,
७. सुदवडी – १०,
८. वडेश्वर – ७,
९. सावळा – ७,
१०. मुंढावरे – २२,
११. टाकवे खुर्द – ९,
१२. भोयरे – २५,
१३. गहुंजे – ४,
१४. इंगळूण – ५,
१५. आपटी (आतवण) – १७
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– श्री लोहगड ते श्री भिवगड : मावळ तालुक्यात तब्बल 23 वर्षांनंतर धारातीर्थ गडकोट मोहीम – जाणून घ्या मोहिमेबद्दल
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जानेवारी महिन्याचे वेळापत्रक जाहीर
– धक्कादायक ! खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीला संपवलं ; रस्त्यात गाडी अडवून केला प्राणघातक हल्ला
– कामशेतमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांकडून एकेरी वाहतुकीचा पर्याय, 1 जानेवारीपासून अंमलबजावणी ; पाहा कुठून एन्ट्री, कुठे होणार एक्झिट


