Dainik Maval News : मावळ तालुक्यातील पवना धरणात नाव उलटून दोन तरुणांच्या मृत्यूप्रकरणी बंगला मालकासह नावेच्या मालकाविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार अहिरे, मयूर भारसाके (दोघे मूळ रा. भुसावळ, जि. जळगाव) अशी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
तुषार आणि मयूर मित्रांसोबत पवना धरण परिसरात बुधवारी (4 डिसेंबर) फिरायला गेले होते. धरणाच्या पाणलोट क्षेत्राजवळ त्यांनी लेक एस्केप व्हिला बंगला भाड्याने घेतला होता. बंगल्याच्या परिसरातून धरणाच्या पाणलोटात उतरण्यासाठी मार्ग आहे. पाणलोट क्षेत्रात नाव लावली होती. या नावेतून तुषार, मयूर आणि त्याचे मित्र बुधवारी दुपारी चारच्या सुमारास फिरायला गेले. त्यानंतर मयूर भारसाके ज्या नावेत होता, ती नाव अचानक उलटली. मयूर बुडतोय, हे पाहून दुसऱ्या नावेत असणारा तुषार अहिरे त्याला वाचवायला गेला. दोघांनी पोहत बाहेर येण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघे जण बुडाले.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि शिवदुर्ग रेस्क्यू पथकातील स्वयंसेवकांनी दोघांना बाहेर काढले. उपचारांपूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता. दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. बंगला, तसेच नावेच्या मालकाच्या बेजबाबदारपणामुळे दुर्घटना घडल्याची फिर्याद तरुणांच्या नातेवाइकांनी पोलिसांकडे दिली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देवाभाऊ 3.0 : “मी देवेंद्र सरीता गंगाधरराव फडणवीस, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…” राज्यात नव्या ‘देवेंद्र’पर्वाचा आरंभ । Maharashtra New CM
– मुख्यमंत्री बनताच देवेंद्र फडणवीस यांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर, पुण्याच्या रुग्णाला पाच लाखांची मदत
– “मी अजित आशाताई अनंतराव पवार, गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की… अजित पवार यांनी विक्रमी सहाव्यांदा घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ