Dainik Maval News : मावळ तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निमित्ताने पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संख्याबळ अधिक असलेल्या, मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर अवघ्या पाच संचालकांचे संख्याबळ असलेल्या भारतीय जनता पक्षाचे सभापती झाले आणि संपूर्ण राज्यभर मावळात राष्ट्रवादी काँग्रेसला आलेल्या नामुष्कीची चर्चा झाली.
दरम्यान या पराभवाने संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुक्यातील प्रमुख नेते, पदाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांनी तातडीने सर्व संचालकांची बैठक घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण १३ संचालकांना सोमवारीच आपले राजीनामे सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच या आदेशाचे पालन न केल्यास पक्षीय कारवाई करण्याचा इशारा दिला होता.
दरम्यान आमदारांच्या या कडक सूचनेनंतरही १३ पैकी केवळ ९ संचालकांनी राजीनामे दिले. तसेच उर्वरित राष्ट्रवादी काँग्रसेच्या एकूण ४ संचालकांनी राजीनामे न देता वेट अँड वॉच ची भूमिका घेतल्याने तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
राजीनामे दिलेल्या सदस्यांची नावे :
1. सुप्रिया अनिल मालपोटे,
2. अंजली गोरख जांभुळकर,
3. भरत दशरथ टकले,
4. अमोल अरूण मोकाशी,
5. मारुती नाथा वाळुंज,
6. दिलीप नामदेव ढोरे,
7. विक्रम प्रकाश कलवडे,
8. नथुराम शंकर वाघमारे,
9. विलास सदाशिव मालपोटे
वरील नऊ संचालक वगळात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेले संभाजी शिंदे, नामदेव शेलार, विलास मानकर आणि शंकर उर्फ बाळासाहेब अंतू वाजे यांनी अद्याप राजीनामे दिलेले नाहीत. तर, नुकतेच सभापती म्हणून निवडून आलेले सुभाषराव जाधव आणि शिवाजी असवले, साईनाथ मांडेकर, नामदेव कोंडे, बंडू घोजगे हे पाच जण सध्या भाजपावासी आहेत.
एकंदरीत १८ संचालक असलेल्या मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीतील १८ पैकी ९ सदस्यांनी राजीनामे दिले असल्याने, केवळ ९ संचालक बाकी आहेत किंवा पदावर आहेत. जर ९ संचालकांचे त्यांनी दिलेले राजीनामे स्वीकारले गेले, तर बाजार समिती संचालकांचा १० चा कोरम पूर्ण होत नसल्याने सध्या अस्तित्वात असलेली संचालक बॉडी बरखास्त होऊन मावळ बाजार समितीवर प्रशासकराज किंवा प्रशासक मंडळ येऊ शकेल. तसेच राजीनामा दिलेल्या ९ पैकी एकानेही राजीनामा मागे घेतला तरीही संभाव्य बरखास्तीची कारवाई टळली जाईल.
परंतु सध्याची मावळातील राजकीय परिस्थिती पाहता, आमदार सुनील शेळके यांच्या आवाहनाला पाठींबा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण १३ संचालकांचे राजीनामे होतात का, तसेच राष्ट्रवादीचे उर्वरित चारही संचालक राजीनामे देणार का… की मावळच्या राजकारणात बाजार समितीच्या निमित्ताने काही उलटफेर होतो, हे पाहणे औत्सुक्याचे राहील.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पुणे जिल्हा परिषदेचे चार विषय समित्यांचे सभापती ठरले ; मावळ, वेल्हे, हवेली, इंदापूर तालुक्यांना मिळाला मान
– ‘सुनेत्रा वहिनींनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावं…’ – आमदार सुनील शेळके
– राज्यात आजपासून ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाला प्रारंभ ; सुदृढ गावांना मिळणार ‘आरोग्यसंपन्न गाव’ किताब