महाराष्ट्र हे शेतकऱ्यांचे राज्य आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा वाटा मोलाचा आहे. तसेच राज्यातील निम्म्याहून अधिक जनता ही शेती आणि त्याच्याशी निगडीत व्यवसायांवर अवलंबून आहे. परंतू निसर्गाचा लहरीपणा आणि अन्य अडचणींमुळे शेतकरी आणि शेतीवर अवलंबून असलेल्या जनतेला अनेकदा अडचणींना सामोरे जावे लागते. परंतू राज्यातील शेतकरी आणि संबंधित जनतेच्या आयुष्यात सुलभता आणि बरकता यावी, त्यांना प्रोत्साहन मिळावे, सुरक्षितता मिळावी ह्यासाठी राज्यात कृषि विभागामार्फत अनेक कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत. राज्यात शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या असलेल्या काही योजनांची माहिती आज आपण या लेखातून घेणार आहोत… ( Maharashtra Govt Various Schemes For Agriculture And Farmers See Complete Information )
1. पंतप्रधान पीक विमा योजना ( Pradhan Mantri Crop Insurance Scheme )
शासनाने सुरु केलेली पंतप्रधान पीक विमा योजना निश्चित फलदायी असून या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याने केवळ 1 रुपया भरुन नाव नोंदणी करावयाची आहे, विमा हप्त्याची रक्कम केंद्र शासन भरणार आहे. शेतकऱ्याने आपले आधार, ७/१२ उतारा, बँक पासबुक झेरॉक्स, पीक पेरणी स्वयंघोषणा पत्र घेऊन आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन नाव नोंदणी केल्यानंतर त्यांना लाभ मिळणार आहे. अतिवृष्टी अथवा अवर्षणाने जमीन नापेर राहिल्यास त्या क्षेत्रालाही विमा संरक्षण मिळण्याची तरतूद या योजनेत करण्यात आली आहे.
2. राष्ट्रीय कृषि विकास योजना – शेततळ्यासाठी अर्थसहाय्य ( National Agricultural Development Scheme )
राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत संरक्षित सिंचन सुविधासाठी विविध आकारमानाच्या शेततळे अस्तरीकरणासाठी किमान १५×१५×१५ मीटर आकाराच्या शेततळ्यासाठी २८ हजार २७५ रुपये व कमाल ३०×३०×३० मीटर आकाराच्या शेततळ्यासाठी ७५ हजार रुपये रकमेच्या मर्यादेत अनुदान देय आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत ही वरील प्रमाणे रक्कम उपलब्ध होत आहे.
शेततळ्यासाठी जास्तीत जास्त ७५ हजार रुपये अनुदान
विविध आकारमानाच्या शेततळ्या पैकी कोणत्याही एका आकारमानाच्या शेततळ्याकरिता मागणी अर्ज महाडीबीटी पोर्टलवर करता येईल. यामध्ये जास्तीत जास्त ३४×३४×३ मीटर व कमीत कमी १५×१५×३ मीटर आकारमानाचे इनलेट आऊट लेटसह किंवा इनलेट- आऊटलेट विरहित शेततळे घेता येणार असून शेततळ्याच्या आकारमानानुसार अनुदानाची जास्तीत जास्त रक्कम ७५ हजार इतकी असणार आहे.
3. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ( Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme )
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड, गांडूळ खत युनिट, नाडेप कंपोस्ट युनिट, बांबू लागवड इ. लाभ दिले जातात. ह्या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांचा ८ अ हा २ हेक्टर (५ एकर) क्षेत्र असावे. तो जॉब कार्ड धारक असावा. ग्रामसभेचा ठराव देखील आवश्यक.
4. फळबाग लागवडीसाठी अनुदानाच्या २ योजना
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडी करिता पात्र ठरु शकत नाहीत, अशा शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना कार्यान्वित असून किमान ०.२० हेक्टर ते कमाल ६.०० हेक्टर क्षेत्र असणारे शेतकरी यासाठी पात्र आहेत. यामध्ये फळपिके, आंबा कलमे व रोपे, पेरु कलमे व सधन लागवड, डाळींब कलमे, कागदी लिंबु, नारळ, सिताफळ, आवळा, चिंच, जांभुळ, अंजीर, चिक्कु, मोसंबी, संत्री इत्यादी पिकांच्या लागवडीसाठी निर्धारीत अंतरावर लागवड केल्यास संबंधीत शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे.
5. कृषी यांत्रिकीकरणासाठी अनुदान
ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि ट्रॅक्टर चलित औजारे, ठिबक आणि तुषार सिंचन संच, शेडनेट, पॉली हाऊस, कांदाचाळ, प्लास्टिक मल्चिंग इ. बाबींसाठी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज केल्यास त्यांना लाभ घेता येईल.
6. शेती व शेतकऱ्यांसाठी विविध योजना ( various schemes for agriculture and farmers )
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात अनुग्रह अनुदान योजना, हवामान आधारित फळपिक विमा योजना, सर्वसमावेशक पिक विमा योजना, PM किसान योजना, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत पीक प्रात्यक्षिके, प्रमाणित बियाणे, मोटर, पाईप इत्यादीसाठी अनुदानाच्या अनेक योजना कृषि विभागामार्फत राबविल्या जातात. या योजनांबाबत अधिक माहितीसाठी स्थानिक पातळीवरील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे संपर्क केल्यास या योजनांविषयी माहिती व मार्गदर्शन करण्यात येते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा
– रस्त्याच्या बाजूला त्याला पाण्यात काहीतरी दिसले, निरखून पाहिले तेव्हा शॉकच बसला! 15 फुटी अजगर मस्तपैकी…
– सत्तेत गेल्यावर आमदार सुनिल शेळकेंनी मावळसाठी आणला तब्बल 39 कोटींचा निधी; पाहा होणाऱ्या कामांची यादी
– पवना बंदिस्त जलवाहिनीचे काम सुरु करा, भाजपच्या आमदाराची विधानसभेत मागणी, वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता!