पवना बंदिस्त जलवाहिनी हे नाव जरी उच्चारले, तरी अनेकांना आठवतो तो मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील पवना गोळीबार प्रकरणाचा काळाकुट्ट इतिहास. तीन शेतकऱ्यांच्या बलिदानानंतर पवना जलवाहिनीचा मुद्दा पाठीमागे पडला खरा, पण तो पूर्णपणे रद्द करण्यात आलेला नाही. त्यामुळे आजही ह्या मुद्द्यावरुन राजकारण होताना आणि आंदोलन वगैरे होताना दिसते. अशातच पिंपरी चिंचवड भागातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्याच एका आमदाराने दोन दिवसापूर्वी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा उचलून धरल्याने पवना बंदिस्त जलवाहिनीच्या मुद्द्यावरुन वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता नाकारता येणार नाही. ( Start Work of Pavana Sealed Water Channel Demand Of BJP MLA Mahesh Landge )
भोसरी विधानसभेचे विद्यमान भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी विधीमंडळात ह्या मुद्द्यावर भाष्य केले. पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीपुरवठा सक्षम करण्याच्या दृष्टीने पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कार्यान्वित करण्याबाबत पावसाळी अधिवेशनात लांडगेंनी राज्य सरकारचे लक्ष वेधले. राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून प्रकल्पाचा “जैसे थे” आदेश रद्द करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
तसेच यावेळी त्यांनी पवना नदीतून पाणी उचलण्यापेक्षा पवना बंद पाईपलाईन द्वारे पाणी पुरवठ्याचे करण्याचे फायदे देखील सभागृहाला सांगितले.
1. पाण्याची कमी हानी – नैसर्गिक नद्यांपेक्षा बंद पाईपलाईनमध्ये गळती होण्याची शक्यता कमी असते, याचा अर्थ वापरासाठी जास्त पाणी उपलब्ध असते.
2. पाण्याची उत्तम गुणवत्ता – नैसर्गिक नद्यांपेक्षा बंद पाईपलाईन प्रदूषकांमुळे दूषित होण्याची शक्यता कमी असते, सध्या रावेत बंधाऱ्यातून पाण्याचा उपसा करून ते शुद्धीकरणासाठी निगडी येथे पाईपलाईन द्वारे पाठवले जाते. पवना धरण ते रावेत बंधारा हे अंतर अंदाजे 35 किमी आहे. या भागात वाढत्या शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे प्रदूषित पाणी थेट पवना नदीत मिसळले जाते. हे पाणी शुद्ध करण्यासाठी अतोनात प्रयत्न करावे लागतात. बंद जलवाहिनीमुळे जलशुद्धीकरण केंद्रावरची जोखीम कमी होईल तसेच खर्चामध्ये बचत शक्य होईल.
3. गावकऱ्यांचा गैरसमज – बंद पाईपलाईन मुळे पवना नदीचे पाणी आटेल असा मावळ मधील शेतकऱ्यांचा गैरसमज आहे याला कोणतेही शास्त्रीय प्रमाण नाही. बंद पाईपलाईन मुळे नदीवर किंवा त्याच्या सभोवतालच्या जैवव्यवस्थेवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही.
4. नदी कायम प्रवाहित राहील – बंद पाईपलाईनद्वारे पवना धरणातून शहराला मंजूर कोट्याएव्हढेच पाणी उचलले जाईल. धरणातून सोडलेले व भूगर्भातून नदीला मिळणारे पाणी यामुळे नदी कायम प्रवाहित राहील.
5. देशातील इतर शहरांची स्थिती – पिंपरी चिंचवड शहर विस्ताराचा वेग अधिक आहे. देशभरातील मोठ्या शहरांना त्यांच्या नजीकच्या धरणातून बंद पाईपलाईनद्वारे पुरवठा होतो. त्यामुळे जर बंद पाईपलाईन प्रकल्प राबवला नाही तर 30 लाख नागरिकांच्या आयुष्याशी खेळण्यासारखे होईल, असे मत लांडगे यांनी सभागृहात बोलताना मांडले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– पक्क्या लायसन्ससाठी मावळ तालुक्यात ‘या’ दिवशी आरटीओकडून मेळाव्याचे आयोजन, पाहा तारीख आणि ठिकाण
– कामशेत पोलिसांकडून गावठी बंदूक व जिवंत काडतुसांसह एकाला अटक, गोठ्यात लपवली होती बंदूक, वाचा सविस्तर
– बेकायदा पार्किंग ते चौकाचौकात सीसीटीव्हीची गरज; मनसे शिष्टमंडळाने घेतली नवनियुक्त पोलिस निरीक्षकांची भेट । Vadgaon Maval